

Pakistan breaks ceasefire foreign ministry of india confirms
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या काही तासांनंतरच पाकिस्तानने त्याचे उल्लंघन केले. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी (दि. 10) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने उघडपणे युद्धबंदीकराराचे उल्लंघन केले आहे, जे अत्यंत निंदनीय आहे. ते म्हणाले की, गेल्या काही तासांपासून वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन होत आहे. यासाठी पाकिस्तान पूर्णपणे जबाबदार आहे आणि आम्ही त्यांना ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन त्वरित कारवाई करण्याचा सल्ला देतो. ते म्हणाले की, भारतीय सुरक्षा दलांना कोणत्याही उल्लंघनाला कडक आणि अचूक प्रत्युत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, ‘आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या DGMO यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्याबाबत निर्णय झाला होता. मागील काही तासांपासून पाकिस्तानकडून या निर्णयाचं उल्लंघन केलं जात आहे. भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत आहे आणि हे उल्लंघन अत्यंत खेदजनक आहे आणि याला पाकिस्तान जबाबदार आहे. आम्हाला वाटते की पाकिस्तानने ही परिस्थिती नीट समजून घ्यावी आणि घेतलेल्या निर्णयाचं पालन करावं.’
केंद्रीय गृहसचिवांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. त्यांनी नागरी संरक्षण महासंचालक यांच्याशीही चर्चा करून प्रत्येक राज्यातील सीमेवरील सद्यस्थितीची माहिती घेतली. एवढेच नाही तर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरी संरक्षण दलाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.