

Pahalgam terror attack |
श्रीनगर : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना जेवण, राहायला जागा आणि इतर साहित्य पुरवणाऱ्या दोघांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी अटक केली आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यात २६ निष्पाप पर्यटक ठार झाले होते आणि १६ जण गंभीर जखमी झाले होते.
पहलगाममधील बटकोट येथील परवेझ अहमद जोथर आणि हिल पार्क, पहलगाम येथील बशीर अहमद जोथर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी हल्ल्यात सामील असलेल्या तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे. हे दहशतवादी प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (एलईटी) शी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याचे त्यांनी सांगितले. परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी हिल पार्कमधील एका झोपडीत या तीन सशस्त्र दहशतवाद्यांना जाणीवपूर्वक आश्रय दिला होता. या दोघांनी दहशतवाद्यांना जेवण, राहायला जागा आणि इतर आवश्यक मदत पुरवली होती. याच दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना घातल्या, असे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.