

Pahalgam Terror Attack Updates
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शनिवारी (दि. २६ एप्रिल) मोठी कारवाई केली. सुरक्षा दलांनी एक दहशतवादी ठिकाण शोधून ते उद्ध्वस्त केले. या ठिकाणावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला, असे पोलिसांनी सांगितले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवले आहे. यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील मुश्ताकाबाद माछिल (समशा बेहक जंगल भाग) येथील सेदोरी नाला येथील जंगल भागात शोध मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांचे एक ठिकाण शोधून ते उद्ध्वस्त केले. येथील घटनास्थळावरून ५ एके-४७ रायफल, ८ एके-४७ मॅगझिन्स, एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, एके-४७ चे ६६० राउंड्स, एक पिस्तूल राउंड आणि ५० राउंड एम४ दारूगोळा जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
''सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांच्या जीवितास आणि सार्वजनिक सुरक्षेला होणारे संभाव्य धोके टळले आहेत. विशेषतः दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या उद्देशाने कारवाया करण्याच्या तयारीत होते. पण सुरक्षा दलांनी तत्काळ केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या नापाक कारवायांना चाप बसला आहे," असे सांगण्यात आले.
जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याला कुख्यात लष्कर-ए- तोयबा दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. भारत सरकारने या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात तीव्र पातळीवर राजनैतिक व सुरक्षा पावले उचलली आहेत. यामुळे तणाव वाढला आहे.