

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jammu Kashmir Terrorist Attack | जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी परिसरात दहशतवाद्यांनी लष्काराच्या वाहनावर गोळीबार केला. राजौरीतील नियंत्रण रेषेजवळ हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर लष्कर सतर्क झाले असून दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील फाल गावात दहशतवाद्यांनी बुधवारी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. दुपारी १:३० वाजताच्या सुमारास सुंदरबनीपासून सुमारे ६ किमी अंतरावर पांडवांनी बांधलेल्या ऐतिहासिक गंडेह मंदिराशेजारी असलेल्या जंगलाजवळ हा हल्ला झाला. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
सुंदरबनी सेक्टरमधील फाल गावाजवळ हा गोळीबार झाला. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्या भागातून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर काही राऊंड गोळीबार केला. त्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. लष्कराने या भागात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेजवळ संशयास्पद हालचाल दिसून आल्यानंतर सीमा सुरक्षा दलाने (BSF) एका घुसखोराला ठार केले होते. यानंतर काही तासांतच राजौरीमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ल्याची घटना घडली.
८ फेब्रुवारी रोजी राजौरी येथील केरी सेक्टरमध्ये एलओसी जवळच्या जंगल भागातून दहशतवाद्यांनी गस्ती पथकावर गोळीबार केला होता. त्याला भारतीय सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ४ आणि ५ फेब्रुवारीच्या रात्री पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भूसुरुंग स्फोटात नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता.