

Pahalgam attack
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे. भारतीय सैन्याने पूंछमधील दहशतवाद्यांचे लपलेले ठिकाण उद्ध्वस्त केली आहेत. येथे 'आयईडी' जप्त करण्यात आले असून, जम्मूमधील तुरुंगांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांवा कट असल्याचा संशय गुप्तचर विभागाने व्यक्त केला आहे.
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, जम्मू आणि काश्मीरमधील तुरुंगांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सूचित केले आहे. यासंदर्भात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवादी जम्मूमधील कोट बलवाल तुरुंग आणि श्रीनगर मध्यवर्ती तुरुंगाला लक्ष्य करू शकतात. या तुरुंगांमध्ये दहशतवाद्यांपासून ते स्लीपर सेलमधील सदस्यांपर्यंत कैदी आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान पूंछमधील सुरनकोट येथे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला. येथे तीन आयईडी टिफिन बॉक्समध्ये आणि २ लोखंडी बादल्यांमध्ये होते.आयईडी जप्त करण्यात आले आहेत. सध्या याबाबत लष्काराने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
२०२३ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील तुरुंगाची सुरक्षा 'सीआरपीएफ'कडून 'सीआयएसएफ'कडे सोपवण्यात आले आहे.जम्मूतील काही तुरुंगांमध्ये दहशतवादीही शिक्षा भोगत आहेत. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्य सतर्क झाले आहे . गुप्तचर माहितीच्या आधारे तुरुंगांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. तसेच सतर्कचेच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. 'सीआयएसएफ'च्या महानिरीक्षकांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम आहे. पहलगाम हल्ल्यानंतर रविवारी रात्री पाकिस्तानने सलग ११ व्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही या आगळीकीला सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मागील ११ दिवस पाकिस्ताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ०४-०५ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या आसपासच्या भागात नियंत्रण रेषेवर छोट्या शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय सैन्याने तातडीने प्रत्युत्तर दिले.