

प्रथमेश तेलंग
नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार शिंदे गटात दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली, तर त्याचे परिणाम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहणार नसून राष्ट्रीय पातळीवर होतील. या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. या ऑपरेशनमुळे शिंदे केवळ महाराष्ट्रातील नेते न राहता राष्ट्रीय पातळीवर ‘एनडीए’चे प्रभावशाली नेते म्हणून उदयास येऊ शकतात.
लोकसभेतील संख्याबळ वाढल्यास शिंदे गटाचे स्थान ‘एनडीए’मध्ये आणखी मजबूत होईल. महाराष्ट्रातून १३ खासदारांचा पाठिंबा असलेला पक्ष म्हणून शिंदे शिवसेना अनेक प्रादेशिक मित्रपक्षांच्या पुढे जाऊ शकताे. परिणामी, ‘एनडीए’तील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत शिंदे यांचा आवाज अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावर होऊ शकतो.
तत्पूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळातही या संख्याबळाचा परिणाम दिसू शकतो. सध्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळातील प्रतिनिधित्व देताना त्यांच्या खासदारसंख्येला महत्त्व दिले जाते. अशा परिस्थितीत शिंदे गटाचे संख्याबळ वाढल्यास भविष्यात केंद्रीय मंत्रिमंडळातील त्यांचा वाटा वाढवण्याची मागणी अधिक जोरकसपणे पुढे येऊ शकते. तसेच, महाराष्ट्रातून महायुतीत सध्या भाजप हा लोकसभेत मोठा पक्ष असला, तरी लोकसभेतील खासदारसंख्येच्या आधारे शिंदे गट अधिक जागांवर दावा करण्याच्या स्थितीत पोहोचू शकतो. २०१९ आणि २०२४ च्या तुलनेत २०२९ मध्ये शिवसेनेचा वाटा वाढवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्याच्या राजकारणातही या घडामोडींचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. खासदारांनंतर आमदारांमध्येही अस्वस्थता निर्माण होण्याची भीती ठाकरे गटाला वाटू शकते. लोकसभा पातळीवर मोठी फूट पडल्यास त्याचा परिणाम विधानसभा पातळीवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर संघटनात्मक आव्हान आणखी वाढू शकते. दरम्यान, या घडामोडींची चिंता केवळ उद्धव ठाकरे यांनाच नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटालाही नक्कीच असणार आहे. ठाकरे गटाचे संख्याबळ घटल्यास महाविकास आघाडीतील शक्तिसंतुलन बदलू शकते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम शरद पवार गटावरही होऊ शकतो.
दुसरीकडे, शिंदे गटाची खासदारसंख्या वाढल्यास महाराष्ट्रातील महायुतीमध्येही त्यांचे राजकीय वजन वाढणार आहे. मंत्रिपदे, महामंडळे, निवडणूक रणनीती, जागावाटप आणि इतर निर्णयांमध्ये शिंदे गटाची भूमिका अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यास या ऑपरेशनने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये प्रचंड मोठे बदल होणार आहेत.