

Rajnath Singh on Operation Sindoor
नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारताने आपल्या भूमीवरील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आणि सशस्त्र दलांनी पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्या नष्ट करण्यासाठी अचूकतेने इतिहास रचला आहे,' असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाला सडेतोड उत्तर दिल्याबद्दल त्यांनी सशस्त्र दलांचे कौतुक केले.
बुधवारी राजधानी दिल्लीत आयोजित सीमा रस्ते संघटनेच्या (बीआरओ) ६६ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला ते बोलत होते. या कार्यक्रमात संरक्षणमंत्र्यांनी बीआरओच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या ५० पायाभूत सुविधा प्रकल्प व्हिडीओ काँफेरेसिंगद्वारे राष्ट्राला समर्पित केल्या.
यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, नियोजनबद्ध रीतीने लक्ष्ये नष्ट करण्यात आली आणि कोणत्याही नागरी लोकवस्तीला हानी पोहचवण्यात आली नाही. आपल्या सशस्त्र दलांनी जे केले आहे ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. ही कारवाई अतिशय विचारपूर्वक आणि अचूक पद्धतीने करण्यात आली.
हि कारवाई केवळ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या छावण्या आणि इतर पायाभूत सुविधा नष्ट करण्यापुरती मर्यादित होती, ज्याचा उद्देश त्यांचे मनोबल तोडणे हा होता. पंतप्रधान मोदींनी सैन्यदलांना पूर्ण पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करतो, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
बीआरओच्या कामाचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित करताना संरक्षणमंत्री म्हणाले की, आधुनिक संरक्षण क्षमता शस्त्रास्त्रांसह त्याला आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांवरही अवलंबून आहे. राजनाथ सिंह यांनी सध्याची भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता सशस्त्र दलांसाठी नव्या पिढीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला.