Operation Sindoor India Pakistan Tensions | अमृतसरमधील पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला! भारताने दिले चोख प्रत्युत्तर
Operation Sindoor India Pakistan Tensions
भारत आणि पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न सुरु असून त्याला भारतीय सैन्यांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. मुख्यतः भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून हल्ले वाढले असून भारतीय सैन्याने शनिवारी पहाटे पाकिस्तानचे ड्रोन हल्ला उधळून लावण्यात यश मिळवले, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
देशाच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरूच आहे. अशाच एका घटनेत, शनिवारी पहाटे ५ वाजता, अमृतसरमधील खासा कॅन्टवर पाकिस्तानचे अनेक सशस्त्र ड्रोन उडताना दिसून आले. पण हवाई संरक्षण युनिट्सनी शत्रूंच्या ड्रोनवर हल्ला केला आणि ते नष्ट केले.
''ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य अनेक हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. आपल्या देशाच्या पश्चिम सीमेवर ड्रोन हल्ले आणि इतर शस्त्रांसह पाकिस्तानचे उघडपणे हल्ले सुरूच आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा पाकिस्तानचा उघड प्रयत्न सहन केला जाणार नाही. भारतीय सैन्य शत्रूच्या कट हाणून पाडेल," असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.
सियालकोटमधील दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त
जम्मू- काश्मीरमधील सीमेवरही तणाव वाढला आहे. अखनूरच्या सीमेच्या पलीकडे पाकिस्तानातील सियालकोट जिल्ह्यातील लूनी येथील दहशतवादी लाँच पॅड सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
गुजरातच्या कच्छ सेक्टरमध्येही भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनद्वारे पाकिस्तानी सैन्याचे ड्रोन पाडले आहे, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.

