

Operation Sindoor India Pakistan Conflict
जम्मू : भारताने सुरु केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू आणि काश्मीरमधील सीमेवर गोळीबार सुरुच आहे. त्याला भारतीय सैन्यही चोख प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्तानच्या गोळीबारात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांबा येथे सुरक्षित छावणीत राहणाऱ्या स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
ओमर अब्दुल्ला भारत-पाकिस्तानदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना म्हटले की, "पाकिस्तानने सैन्याने नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी ड्रोनचा वापर केला. पण भारतीय सैन्याने त्यांचे ड्रोन पाडले आणि त्यांचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. याचे श्रेय आपल्या संरक्षण दलांना जाते.''
पुढे ते म्हणाले की, काश्मीरच्या अनंतनागमध्ये दारूगोळा डेपोलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. पण तो त्यांचा प्रयत्नही हाणून पाडण्यात आला. ही परिस्थिती आम्ही सुरू केली नव्हती. पहलगाममध्ये निष्पाप लोक मारले गेले. त्याला आम्हाला चोख प्रत्युत्तर द्यावे लागले. पाकिस्तान परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण याचा त्यांना कसलाही फायदा होणार नाही. त्यांनी आता माघार घ्यावी. त्यांनी तणाव वाढण्याऐवजी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा.
"पुंछमध्ये मोठे नुकसान झाले आहे. येथे जीवितहानी आणि जखमींचे प्रमाण अधिक आहे. मी काही वेळापूर्वीच जम्मूच्या रुग्णालयाला भेट दिली. तिथे दाखल असलेले सर्व जखमी नागरिक पूंछचे आहेत. पूंछमधील परिस्थिती काहीशी गंभीर आहे. उपमुख्यमंत्री पूंछ येथे जातील आणि ते तेथील लोकांना भेटतील." असे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरच्या सीमा भागातील नागरिकांना त्यांचे निवासस्थान सोडावे लागले. त्यांची व्यवस्था सांबा येथे केली गेली आहे. सीमावर्ती भागांतील नागरिकांसाठी सांबा येथे कॅम्प उभारण्यात आले आहेत.