Operation Sindoor DGMO Rajiv Ghai Press Conference
नवी दिल्ली : "भारताला जी कारवाई करायची ती केली आहे. सामान्य परिस्थितीत दोन देशांचे हवाई दल एकमेकांवर हल्ले करत नाही. दररोज रात्री गोळीबार होत नाही. ऐरवी घुसखोरीचा प्रयत्न दहशतवादी करतात. पण यावेळी आम्हाला अशी माहिती मिळालीये की पाकिस्तान सैन्याची तुकडीही भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे", असा गौप्यस्फोट भारतीय सैन्य संचालनालयाचे महासंचालक राजीव घई यांनी केला. आत्ताची परिस्थिती युद्धापेक्षा कमी नाही. पुढे काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे.
रविवारी संध्याकाळी भारताच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. डीजीएमओ राजीव घई, हवाई दल आणि नौदलाचे महासंचालकांनी संरक्षण दलांच्या कारवायांची माहिती दिली. संरक्षण दलाने उध्द्वस्त केलेल्या तळांचे व्हिडिओच पुरावे म्हणून जगासमोर मांडले.
भारत- पाकिस्तान युद्ध होणार का?
आम्ही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले. आम्ही एअर स्ट्राईक का केले याचं कारणही सांगितलं. पण गेल्या तीन- चार दिवसांपासून जी परिस्थिती आहे ती युद्धापेक्षा कमी नाही. दोन्ही देशांमध्ये शनिवारी युद्धविरामाचा निर्णय देखील झाला. पण या सामंजस्य कराराचेही उल्लंघन झाले आहे, याकडे घई यांनी लक्ष वेधले. युद्ध टाळून शांतता प्रस्थापित करणं, स्थैर्य कायम ठेवणं हे आमचं देखील आहे. पण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तुम्ही जर भारतविरोधी कारवाया केल्या तर आम्ही देखील जशास तसे उत्तर देणारच असे नौदलाचे व्हाइस ॲडमिरल ए ए प्रमोद यांनी ठणकावून सांगितले.
'तिन्ही दलांना Full Authority'
रविवारी संरक्षण दलाच्या प्रमुखांनी परिस्थिती आढावा घेतला. पाकिस्तानकडून उल्लंघन झाल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल. तिन्ही दलांना सडेतोड उत्तर देण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहे, असा इशाराच घई यांनी पाकिस्तानला दिला आहे.