

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताकडून पाकिस्तानचे ६०० हून अधिक ड्रोन हवेतच उद्ध्वस्त करण्यात आल्याचे समजते. भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने पश्चिम सीमावर्ती भागात १००० हून अधिक तोफा प्रणाली आणि ७५० हून अधिक क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्यात आल्या होत्या. भारतीय लष्करी तळ आणि नागरी क्षेत्रांना लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून सतत ड्रोन पाठवले जात होते. या संपूर्ण कारवाईदरम्यान, भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ६०० हून अधिक ड्रोन हवेतच उध्वस्त करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण यंत्रणेत ड्रोन हल्ल्यांना तोंड देण्यासाठी हार्ड किल आणि सॉफ्ट किल अशी २ प्रकारची उपकरणे आहेत. हार्ड किल ड्रोनला पूर्णपणे नष्ट करते तर सॉफ्ट किलमध्ये ड्रोनची प्रणाली जाम होते किंवा विस्कळीत होते. भारतीय सैन्याकडे असलेल्या हवाई संरक्षण तोफा, एल-७०, झेडयू-२३ मिमी आणि शिल्का सारख्या पारंपारिक तोफा यांनी कमी उंचीचे ड्रोन आणि झुंडीने आलेले ड्रोन नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यामुळे शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांमध्येही भारताचे आकाश सुरक्षित राहिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये आधुनिक हवाई संरक्षण रणनीती, विशेषतः ड्रोनविरोधी ऑपरेशन्ससाठी वापरल्याचेही सुत्रांनी सांगितले.