

India temporary airport closure
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम विमान वाहतूकीवर झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरातील २०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आणि श्रीनगरसह किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. हवाई क्षेत्रातील निर्बंधामुळे हा परिणाम झाला असल्याचे विमान वाहतूक कंपन्यांनी सांगितले आहे. एअर इंडिया, इंडिगो, स्पाइसजेट, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि काही परदेशी विमान कंपन्यांनी विविध विमानतळांवरून सेवा रद्द केल्या आहेत.
सूत्रांनी सांगितले की, देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील किमान १८ विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. या विमानतळांमध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.
इंडिगोने हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे अमृतसर आणि श्रीनगरसह विविध विमानतळांवरून १६५ हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. सरकारच्या हवाई क्षेत्रावरील निर्बंधांवरील अधिसूचनेमुळे, १० मे २०२५ च्या भारतीय वेळेनुसार सकाळी ५.२९ वाजेपर्यंत अनेक विमानतळांवरून १६५ हून अधिक इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, असे विमान कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. इंडिगोने म्हटले की, प्रभावित प्रवाशांना पुढील उपलब्ध सेवेवर त्यांच्या विमानाचे वेळापत्रक बदलण्याचा किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांचे तिकीट रद्द करण्याचा पर्याय आहे. पूर्ण पैसे परतफेड केले जातील.
एअर इंडियाने जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणारी आणि येथून येणारी उड्डाणे स्थगित केली आहेत. एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणे १० मे रोजी सकाळी ०५:२९ वाजेपर्यंत रद्द करण्यात येत आहेत, असे एअर इंडियाने म्हटले आहे.
स्पाइसजेट विमान वाहतूक कंपनीने म्हटले की, उत्तर भारतातील धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसर पुढील सूचना येईपर्यंत बंद आहेत. बाधित प्रवाशांना पूर्ण परतफेड मिळविण्याचा किंवा पर्यायी विमान पुन्हा बुक करण्याचा पर्याय आहे. आकासा एअरने श्रीनगरला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली, तर स्टार एअरने नांदेड, हिंडन, आदमपूर, किशनगड आणि भुजला जाणारी सर्व उड्डाणे दिवसभरासाठी स्थगित केली.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानी हवाई क्षेत्र टाळण्यासाठी डझनभर उड्डाणे रद्द केली आहेत. फ्लाइट रडार २४ कडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपर्यंत पाकिस्तानला जाणारी किंवा येणारी किमान ५२ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
भारतातील सर्वात व्यस्त दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्रीपासून किमान ३५ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बदलत्या हवाई परिस्थितीमुळे दिल्ली विमानतळावर काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे, असे दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले.