

Parliament Monsoon Session
दिल्ली : 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत सोमवारी सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. यापैकी सुलेमान लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होता आणि पहलगाम हल्ल्यात सहभागी होता. आमच्या एजन्सींकडे याचे पुरावे आहेत. इतर दोन दहशतवादी देखील ए ग्रेड दहशतवादी होते. पहलगाममध्ये आपल्या लोकांना मारणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना मारले आहे. मला वाटले दहशतवाद्यांना मारलेलं पाहून विरोधक आनंदी होतील. दहशतवाद्यांचा धर्म बघून कोणी दु:खी होऊ नका, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत विरोधकांवर 'स्ट्राईक' केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांबद्दलही शोक व्यक्त केला. अमित शाह म्हणाले की, 'पहलगाम दहशतवादी हल्ला दुपारी १ वाजता झाला आणि मी संध्याकाळी ५:३० वाजता श्रीनगरमध्ये उतरलो होतो. २३ एप्रिल रोजी सुरक्षा बैठक झाली, सर्व सुरक्षा दलांसोबत झालेल्या या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात पळून जाऊ नयेत आणि आम्ही त्यासाठी व्यवस्था केली. आम्हाला दाचीगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. मे ते २२ जुलै या कालावधीत या माहितीची पुष्टी करण्यासाठी प्रयत्न केले गेले. दहशतवाद्यांचे संकेत मिळवण्यासाठी लष्कर, सीआरपीएफ आणि आयबीचे अधिकारी फिरत राहिले. जेव्हा आम्हाला संकेत मिळाले तेव्हा दहशतवाद्यांना घेरण्यात आले. एकूणच, काल झालेल्या कारवाईत, आमच्या निष्पाप नागरिकांना मारणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले.
सुलेमान उर्फ फैजल जाट, अफगाण आणि जिब्रान नावाच्या दहशतवाद्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला केला. या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या लोकांना पहलगाममध्ये हल्ला करणारे हे दहशतवादी आहेत हे ओळखण्यास सांगितले गेले. यासोबतच, घटनास्थळावरून सापडलेल्या काडतुसांची एसएफएल चौकशी करण्यात आली. कालच्या कारवाईत सापडलेल्या काडतुसेचीही तपासणी करण्यात आली आणि रायफल्सही तपासणीसाठी चंदीगडला पाठवण्यात आल्या. या सर्व तपासातून हे तिघेही तेच दहशतवादी असल्याचे सिद्ध झाले.
यावेळी अमित शहा म्हणाले की, "मला वाटले होते की, दहशतवाद्यांना मारल्याची माहिती समजल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनाही आनंद होईल, परंतु असे दिसते की त्यांच्या चेहऱ्यावर शाई लावण्यात आली आहे. दहशतवादी मारले गेले असले तरी तुम्हाला त्रास होत आहे, हे कोणत्या प्रकारचे राजकारण आहे? माझ्या हातात बॅलिस्टिक रिपोर्ट आहे. सुरक्षा तज्ञांनी स्वतः मला फोन करून सांगितले आहे की ऑपरेशन महादेवमध्ये सापडलेल्या या गोळ्या पहलगाममध्ये झाडण्यात आलेल्या गोळ्या आहेत. मी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांना सांगू इच्छितो की मोदी सरकारने दहशतवाद्यांना तसेच त्यांना पाठवणाऱ्या त्यांच्या सूत्रधारांनाही मारले. मी तुम्हाला खात्री देतो की येणाऱ्या काळात कोणीही असे करण्याचे धाडस करणार नाही."
आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास तात्काळ एनआयएकडे सोपवला. तपासात मृतांचे कुटुंबीय, पर्यटक, खेचर चालक, विविध दुकानांमध्ये काम करणारे लोक अशा १०५५ लोकांची चौकशी करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले. नंतर, या आधारे एक स्केच तयार करण्यात आला. अनेक लोकांना अटक करण्यात आली. त्यांनी सांगितले की हल्ल्यापूर्वी तीन दहशतवादी बैसरनच्या ढोक परिसरात आले होते. दोघांनी काळे कपडे घातले होते. ते काही सामान घेऊन तेथून निघून गेले. त्यानंतर एक स्केच तयार करण्यात आला. अटक केलेल्या लोकांनी ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे आणि हे तेच दहशतवादी असल्याची पुष्टी केली आहे. हल्ल्यात दोन एके-४७ आणि एक एम कार्बाइन वापरण्यात आली होती, असे शहा यांनी सांगितले.
गृहमंत्री शहा यांनी काँग्रेस खासदार पी चिदंबरम यांच्या विधानावर सभागृहात टीका केली. त्यांनी त्यांच्यावर दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला. ते म्हणाले की आमच्याकडे पुरावे आहेत, जे मी सभागृहासमोर सादर करेन. त्यांनी सांगितले की, आमच्याकडे मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघांचे मतदार क्रमांक देखील आहेत. ते पाकिस्तानी दहशतवादी होते. दहशतवाद्यांच्या खिशात सापडलेले चॉकलेट देखील पाकिस्तानात बनवले गेले होते," असे सांगितले.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, २२ मे रोजी आयबीला गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली. दाचीगाम परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते २२ जुलै पर्यंत सतत प्रयत्न केले गेले. लष्कराचे जवान सिग्नल मिळवण्यासाठी इकडे तिकडे फिरत राहिले. २२ जुलै रोजी सेन्सर्सद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी झाली. पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने ही कारवाई केली.