

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममधील उमरंगसो (Assam mining accident) या ठिकाणच्या ३०० फूट खोल कोळसा खाणीमध्ये ६ जानेवारीपासून ९ कामगार अडकले आहेत. दरम्यान, आज बुधवारी (दि.८) बचावकार्यादरम्यान कोळसा खाणीतून एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. येथे शोध आणि बचायकार्य सुरुच आहे. आसामधील पावसामुळे अचानक या खाणीत पाणी गेल्याने कामगार अडकले आहेत. मंगळवारी खाणीतील पाण्याची पातळी जवळपास १०० फुटांपर्यंत पोहोचली. यामुळे खाणीत अडकून पडलेल्या काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) पथके आणि इतर यंत्रणांकडून मंगळवारपासून आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील उमरंगसो भागातील कोळशाच्या खाणीत अडकलेल्या ९ जणांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
एनडीआरएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, एनडीआरएफ आणि भारतीय लष्कराच्या पाणबुड्यांना बचावकार्यादरम्यान एक मृतदेह सापडला. एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट एन. तिवारी यांच्या माहितीनुसार, मोठ्या टीमसह २४ तास शोध आणि बचावकार्य सुरु आहे. "शोध आणि बचावकार्य काल संध्याकाळी बंद करण्यात आले होते. आम्ही आज सकाळी पुन्हा ते सुरू केले. आम्ही खाण कामगारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचून त्यांची सुखरूप सुटका करू, अशी आम्हाला अपेक्षा आणि आशा आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.
खाणीमध्ये १०० फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे नौदलाचीही मदत घेण्यात आली आहे. खाणीतून मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी विशाखपट्टणममधून बचाव कार्यास पाचारण करण्यात आले आहे. नौदलातील पाणबुडे, अभियंते, वैद्यकीय पथक, आसाम रायफल्ससह अन्य नागरिकही बचावकार्यात मदत करीत आहेत. राष्ट्रीय आपत्ती दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आहे. दोन मोटारींतून खाणीतील पाणी बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
कोळसा खाणीतील दुर्घटना या नवीन नाहीत. २०१९ साली मेघालयातील कोळसा खाणीत नदीतील पाणी घुसल्यानंतर १५ कामगारांचा मृत्यू झाला होता. २०१४ पासून भारतात बेकायदा कोळसा खाणीवर बंदी घालण्यात आली. तरीही आसामसह ईशान्यकडील काही राज्यात काही राज्यात बेकायदा कोळसा खाणी सुरू आहे.