

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकार रस्ते अपघातातील पीडितांना मोठा दिलासा देणार आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत कॅशलेस उपचार मिळू शकणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कॅशलेस उपचार योजनेची घोषणा केली. याअंतर्गत अपघातग्रस्तांच्या सात दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा खर्च सरकार उचलणार आहे. अपघातानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना माहिती दिल्यास उपचाराचा खर्च सरकार उचलेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यासोबतच हिट अँड रन प्रकरणातील पीडितांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांपर्यंतची भरपाईही त्यांनी जाहीर केली. मंगळवारी दिल्लीतील भारत मंडपम येथे गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, "आम्ही एक नवीन योजना सुरू केली आहे - कॅशलेस उपचार. एखादी दुर्घटना घडल्यानंतर लगेच, 24 तासांच्या आत, पोलिसांकडे माहिती गेल्यावर, आम्ही दाखल होणाऱ्या रुग्णाच्या सात दिवसांच्या उपचारांचा खर्च देऊ किंवा जास्तीत जास्त उपचारासाठी 1.5 लाख रुपये आम्ही हिट अँड रन प्रकरणांमध्ये मृतांना दोन लाख रुपये देऊ,” केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले.
2024 मध्ये रस्ते अपघातात सुमारे 1.80 लाख लोकांनी आपला जीव गमावल्याची चिंताजनक आकडेवारी सांगून सरकारचे सर्वोच्च प्राधान्य रस्ते सुरक्षेला आहे हेही त्यांनी अधोरेखित केले. यापैकी 30,000 मृत्यू हेल्मेट न घातल्याने झाले आहेत, असे गडकरी पुढे म्हणाले. दुसरी गंभीर बाब म्हणजे 66% अपघात हे 18 ते 34 वयोगटातील नागरिकांचे झाले आहेत. गडकरींनी पुढे शाळा आणि महाविद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांजवळ प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी अपुऱ्या व्यवस्थेमुळे झालेल्या रस्ते अपघातात 10,000 मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.