

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला विमानाने दिल्लीला दिल्लीला निघाले, पण विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनामुळे त्यांना जयपूरमध्ये उतरवले. ज्यामुळे मुख्यमंत्री अब्दुल्ला चांगलेच संतापले. रात्री १ वाजता जयपूर विमानतळावर उतरवल्याने अब्दुल्ला यांनी दिल्ली विमानतळावर जोरदार टीका केली आहे.
शनिवारी रात्री इंडिगोचे विमान ओमर अब्दुल्ला यांना घेऊन जम्मूहून दिल्लीला रवाना झाले. परंतु दिल्ली विमानतळावर विमानांची गर्दी असल्याने विमान उतरण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही आणि विमान थेट जयपूरला वळवण्यात आले. तिथे रात्री उशिरा १ वाजता विमान पोहचले. विमानातून उतरल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पारा चढला. त्यांनी एक सेल्फी शेअर करत सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या. "दिल्ली विमानतळ म्हणजे एक संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे (अश्लील भाषेसाठी क्षमस्व, पण आता सभ्य बोलण्याच्या मूडमध्ये नाही). जम्मूहून निघाल्यानंतर ३ तास हवेत फिरवून आम्हाला जयपूरला वळवलं. आता मी विमानाच्या जिन्यावर उभा राहून थोडी ताजी हवा घेत आहे. इथून कधी निघणार, काहीच कल्पना नाही." असे अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, शनिवारी श्रीनगर विमानतळावर खराब हवामानामुळे सहा विमाने रद्द करण्यात आली. यामुळे जम्मू विमानतळावरही अनेक प्रवासी अडकले होते. तिथे उडानांच्या विलंब व रद्द होण्याच्या प्रकारांमुळे पूर्ण गोंधळाचं वातावरण होतं आणि शेकडो प्रवासी अडकल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली होती.