

Omar Abdullah on Pahalgam Terrorist Attack
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेने संपूर्ण देशाला प्रभावित केले आहे. आपण यापूर्वी असे अनेक हल्ले पाहिले आहेत. बैसरनमध्ये २१ वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांवर हल्ला झाला आहे. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची माफी कशी मागावी, हे मला कळत नाही. पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे माझे कर्तव्य होते. मी ते करू शकलो नाही. माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा भावना जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.२८) बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ते बोलत होते.
ओमर अब्दुल्ला यांनी दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आम्हाला पार पाडता आली नाही. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मी या क्षणाचा वापर राज्यत्वाची मागणी करण्यासाठी करणार नाही. पहलगाम नंतर, मी कोणत्या तोंडाने जम्मू आणि काश्मीरला राज्यत्व मागू शकतो? मेरी क्या इतनी सस्ती सियासत है? आम्ही भूतकाळातही राज्यत्वाबद्दल बोललो आहोत आणि भविष्यातही असेच बोलू, परंतु जर मी केंद्र सरकारला सांगितले की २६ लोक मरण पावले आहेत, तर आता मला राज्यत्व द्या, हे माझ्यासाठी लज्जास्पद असेल.
२२ एप्रिलरोजी पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन खोऱ्यात हा दहशतवादी हल्ला झाला होता. यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील बहुतेक पर्यटक होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाची शाखा असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने सुरुवातीला या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु नंतर त्यांनी हात वर करत आपली जबाबदारी झटकली होती.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांना विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली होती. उपराज्यपाल सिन्हा यांनी ही विनंती मान्य करत आज २८ एप्रिल रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यास मान्यता दिली होती. आज सकाळी १०:३० वाजता अधिवेशनाला सुरूवात झाली.
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की हे अधिवेशन दहशतवादाविरुद्ध विशेष असेल. जम्मू विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा म्हणाले की, "सर्वपक्षीय बैठकीत दहशतवादाविरुद्ध सर्वांनी एकता दाखवली. केंद्राच्या दहशतवादाबाबतच्या निर्णयांना सर्वांनी पाठिंबा दिला. विधानसभेच्या अलिकडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण अनेक लढाया लढल्या आहेत. सीमेवर तणाव आहे, लोकांच्या मनात भीती आहे, हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, हा शोककाळ आहे. सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.