Office Romance Survey : ‘ऑफिस रोमान्स’मध्ये भारत जगात दुसऱ्या स्थानी, 40% कर्मचाऱ्यांनी केले सहकाऱ्यालाच डेट

India Office Romance Survey : 36% महिलांकडून 'वर्कप्लेस रोमान्स'ची कबुली
Office Romance Survey
Published on
Updated on

office romance survey india ranks second globally mexico topped in list

नवी दिल्ली : आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात आणि वाढत्या व्यावसायिक वेळेमुळे, कामाच्या ठिकाणी जुळणाऱ्या प्रेमसंबंधांची संख्या वाढत आहे. एका महत्त्वपूर्ण जागतिक सर्वेक्षणातून याची माहिती समोर आली आहे. भारतात अशा ‘रोमान्स’चा प्रसार लक्षणीयरीत्या वाढल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ॲशली मॅडिसन (Ashley Madison) आणि यूगोव्ह (YouGov) या संस्थांनी ११ देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ऑफिसमधील प्रेमप्रकरणांमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर मेक्सिको या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

सर्वेक्षणातील प्रमुख आकडेवारी

सर्वेक्षणामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, मेक्सिको, स्पेन, स्वित्झर्लंड, यूके आणि यूएस या 11 देशांतील 13,581 प्रौढ व्यक्तींचा समावेश होता. या आकडेवारीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, कामाच्या ठिकाणाचे नियम आणि आचारसंहिता याबाबत कंपन्यांमध्ये जागरूकता वाढत असतानाही, भारतात 'वर्कप्लेस रोमान्स'ची प्रकरणे अजिबात कमी झालेली नाहीत.

मेक्सिकोमध्ये 43% लोकांनी सहकाऱ्यासोबत रोमँटिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. भारतात हा आकडा 40% इतका आहे. म्हणजेच, प्रत्येक दहापैकी चार भारतीयांनी भूतकाळात किंवा सध्या कामाच्या ठिकाणच्या सहकाऱ्याला डेट केले आहे. अमेरिका, यूके आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हा आकडा केवळ 30% आहे, जो भारतापेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहे.

महिलांपेक्षा पुरुष जास्त 'रिस्क टेकर'

या अभ्यासात लिंगाधारित एक मनोरंजक तफावत दिसून आली आहे. 51% पुरुषांनी सहकाऱ्याला डेट केल्याची कबुली दिली. तर याबाबतीत महिलांचे प्रमण कमी आहे. 36% महिलांनी 'वर्कप्लेस रोमान्स'ची कबुली दिली. यावरून असे सूचित होते की, 'ऑफिस रोमान्स'च्या बाबतीत जोखीम घेण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा जास्त आहे.

'ऑफिस रोमान्स'मधील लिंगभेद

'ऑफिस रोमान्स'च्या बाबतीत महिला आणि पुरुष यांच्या दृष्टिकोनात महत्त्वपूर्ण फरक दिसून येतो. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांची सरमिसळ झाल्यास उद्भवणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल महिला अधिक सावध असतात, तर पुरुषांच्या चिंतेची कारणे थोडी वेगळी आहेत.

महिला अधिक संवेदनशील

सुमारे 29% महिलांना कामाच्या ठिकाणच्या प्रेमसंबंधांमुळे करिअरवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती वाटते. त्यामुळे याच कारणामुळे त्या अशा संबंधांपासून दूर राहतात. पुरुषांमध्ये हे प्रमाण थोडे कमी (27%) आहे. यावरून स्पष्ट होते की, महिला ऑफिस रोमान्सच्या धोक्यांबाबत अधिक गंभीरपणे विचार करतात.

पुरुषांची मोठी काळजी

याउलट, पुरुष वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत आणि परिणामांबद्दल जास्त काळजीत असल्याचे आढळले आहे. 30% पुरुषांनी वैयक्तिक समस्या किंवा संबंधातील धोक्यांमुळे 'ऑफिस रोमान्स' टाळल्याचे सांगितले आहे, तर महिलांमध्ये हा आकडा 26% इतका आहे.

'जेन झी'ची सावध पाऊले

ऑफिस रोमान्सबाबतची सर्वाधिक काळजी तरुण पिढीला आहे. 18 ते 24 वयोगटातील तरुण कर्मचारी (Generation Z) या बाबतीत सर्वात जास्त सावध आहेत. यातील 34% तरुणांना अशा प्रेमसंबंधांचा त्यांच्या करिअरवर काय परिणाम होईल याची तीव्र चिंता वाटते. याचा अर्थ, कामाच्या ठिकाणी असलेले नातेसंबंध करिअरच्या सुरुवातीलाच धोकादायक ठरू शकतात, याची जाणीव नव्या पिढीला अधिक आहे.

भारतातील प्रेम, लग्न आणि नातेसंबंधांच्या पारंपरिक संकल्पना आता झपाट्याने बदलत आहेत. ‘ऑफिस रोमान्स’मध्ये भारताने दुसरे स्थान पटकावणे, ही वाढती स्वीकृती मानली जात आहे. या बदलाचा थेट संबंध ‘ओपन मॅरेज’ सारख्या अपारंपरिक संबंधांना मिळत असलेल्या वाढत्या स्वीकृतीशी आहे.

'ओपन रिलेशनशिप्स'चा ट्रेंड

विवाहित लोकांमध्ये विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी असलेल्या ‘Gleeden’ ॲपने केलेल्या एका सर्वेक्षणातून काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या 35% भारतीय 'ओपन रिलेशनशिप'मध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 41% भारतीयांनी जर त्यांच्या जोडीदाराने पुढाकार घेतला, तर 'ओपन रिलेशनशिप'चा विचार करण्याची तयारी दर्शवली आहे.

मेट्रो ते गाव : बदलाची चाहूल सर्वत्र!

हा बदल केवळ मुंबई, दिल्लीसारख्या मेट्रो शहरांपुरता मर्यादित नाहीये. लहान शहरे आणि गावांमध्येही हेच 'ट्रेंड्स' स्पष्टपणे दिसत आहेत, जे सूचित करतात की नातेसंबंधांबद्दलची भारतीयांची मानसिकता आता सर्वदूर बदलत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news