

आजमितीस अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन हेच त्यांचे विश्व बनलेले आहे. त्याविना आयुष्य अशी कल्पनाही त्यांना करवत नाही. हेच कारण आहे की, आजघडीला देशातील दर चार व्यक्तींपैकी तीनजण 'नोमोफोबिया'ने ग्रस्त आहेत. काऊंटरपॉईंट, ओप्पोने संयुक्तपणे केलेल्या एका पाहणीत हे वास्तव समोर आले.
नो मोबाईल फोन फोबिया म्हणजे आपला मोबाईल आपल्यापासून दुरावेल, अशी सतत वाटणारी भीती. इंटरनेट बंद पडेल का, फोन हरवेल का, त्याची बॅटरी संपेल का, असे विचार 'नोमोफोबिया'ग्रस्त व्यक्तीच्या डोक्यात सतत घोंघावतात. त्यातून अनेकांना असहाय समजणे, चिंताग्रस्त होणे, तसेच भावनिक अस्वस्थतेलाही सामोरे जावे लागते.