नोएडाच्या लॉजिक्स मॉलला भीषण आग, धुराचे लोट पाहून नागरिकांची धावपळ
नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन
देशाची राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये आगीच्या घटना काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. आता या ठिकाणी लॉलिक्स मॉलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
नोएडाच्या लॉजिक्स मॉल (Logix Mall) मध्ये आज (शुक्रवार) आग लागल्याची घटना समोर आली आहे. या मॉलमधील कपड्यांच्या एका शोरूमला ही आग लागली आहे. दरम्यान याची माहिती लोकांना होताच सर्व लोकांना तात्काळ दुकानातून बाहेर काढण्यात आले असून, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
हेल्मेट घालून बचावकार्य
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यावेळी प्रचंड धुरामुळे कर्मचाऱ्यांनी हेल्मेट घालून नागरिकांना बाहेर काढले.
धुरामुळे श्वास घेण्यात अडथळा
आग लागल्यावर या मॉलमध्ये काळाकुट्ट धुर पसरला. यामुळे या ठिकाणी श्वास घेणे अवघड बनले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत नागरिकांना मॉलमधून सुरक्षितपणे बाहेर काढले.
मॉलमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी
लॉजिक्स मॉल नोएडा सिटी सेंटर मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या मॉलमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. अशाच प्रकारे आजही लोक खरेदीसाठी या मॉलमध्ये आले होते. यावेळी आग लागल्याने लोकांची धावपळ सुरू झाली.

