

श्रीनगर : "दहशतवाद्यांनी आमच्या देशवासीयांवर धर्म विचारुन गाेळ्या झाडल्या; पण आम्ही त्यांचे कर्म बघून त्यांच्या खात्मा केला", अशा शब्दांमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (दि. १५ ) पाकिस्तानला ठणकावून सांगितले. ते आज (दि.१५) जम्मू- काश्मीरच्या बदमी बाग छावणीत सैनिकांशी संवाद साधत होते. त्यांनी यावेळी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झालेल्या जवानांना अभिवादन केले. तसेच भारतीय जवानांच्या शौर्याचा मला अभिमान असल्याचेही त्यांनी नमूद केले.
'ऑपरेशन सिंदूर' आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. सैन्याच्या कामगिरीवर गर्व असल्याचा भारतीयांचा संदेश घेऊन मी तुमच्या भेटीला आलो असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सैनिकांना सांगितले.
पाकिस्तानच्या छाताडावर बसून भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या अणुहल्ल्यांना न घाबरता भारताने चोख उत्तर दिले. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पोसणं बंद करावं. पाकिस्तानसोबत आता फक्त दशहतवादविरोधात आणि POKबाबतच चर्चा होईल. पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या तर पुन्हा ठेचून काढू, असा कडक इशारा देखील राजनाथ सिंह यांनी दिला.
दहशतवाद्यांच्या आजाराला ऑपरेशन सिंदूर हेच जालीम औषध होते. पाकिस्तानसारख्या बेजबाबदार देशाच्या हातात आण्विक अस्त्र असणे योग्य आहे का ? असा सवाल देखील राजनाथ सिंग यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला याप्रसंगी केला आहे. तसेच IMF ने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानऐवजी गरीब देशांना मदत करावी, असा सल्लाही राजनाथ सिंह यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारत प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जम्मू आणि काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थिती आणि सशस्त्र दलांच्या लढाऊ तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी (दि.१५) येथे दाखल झाले. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेशाचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. सिंह जम्मू आणि काश्मीरमधील एकूण सुरक्षा परिस्थिती आणि सशस्त्र दलांच्या लढाऊ तयारीचा आढावा घेतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.