भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधातील सर्व एफआयआर रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. ब्रिजभूषण सिंह यांनी लैंगिक छळाच्या प्रकरणाशी (sexual harassment of female wrestlers) संबंधित ट्रायल न्यायालयाची कारवाई रद्द करण्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर आणि एफआयआर रद्द करण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाने ताकीद दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबर रोजी आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, जर सिंह यांना कारवाईला आव्हान द्यायचे होते, तर त्यांनी खटला सुरू होण्यापूर्वी तसे करायला हवे होते. न्यायमूर्ती नीना बन्सल यांच्या खंडपीठाने ही याचिका दाखल करुन सिंह यांनी तिरकस मार्ग अवलंबल्याचे नमूद केले.
ब्रिजभूषण सिंह यांचे वकील राजीव मोहन यांनी युक्तिवाद केला की, महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारी आणि एफआयआर तसेच कारवाई छुप्या अजेंड्यांनी प्रेरित आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील कारवाई न्याय नसून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा वकिलांनी केला.
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत सिंह यांनी दावा केला आहे की, तपास पक्षपाती पद्धतीने केला गेला. कारण केवळ पीडितांच्या बाजूचा विचार केला गेला, ज्यांना त्याच्याविरुद्ध बदला घेण्यास स्वारस्य आहे. या गोष्टीची दखल न घेता ट्रायल न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले. सर्व आरोप खोटे आहेत.