पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान आणि बांगलादेश ( PAK vs BAN) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संभाव्य संघाची घोषणा केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संघातील स्टार गाेलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) याला संघातून वगळण्यात आले आहे. अबरार अहमद आणि मीर हमजा याला संघात स्थान मिळाले आहे.
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला नामुष्कीजनक पराभवाला सामोर जावे लागले होते. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा १० गडी राखून पराभव करून बांगलादेशन संघाने इतिहास घडवला होता.घरच्या मैदानावर झालेला पराभवामुळे क्रिकेट संघावर चौफेर टीका होत आहे. आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना रावळपिंडी येथे ३० ऑगस्टपासून खेळवला जाणार आहे. आता दुसरा सामना जिंकून किमान मालिका बरोबरीत सोडण्याचे लक्ष्य संघासमोर आहे.
शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज आहे. मात्र त्याला दुसर्या कसोटीत स्थान देण्यात आलेले नाही. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात शाहीन आफ्रिदी याला फक्त दोनच विकेट घेता आल्या होत्या. आता आगामी सामन्यापूर्वी त्याला वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी अबरार अहमद याला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या सामन्यात नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली यांचा पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीत समावेश करण्यात आला होता. मात्र, या गोलंदाजांना फारसा प्रभाव सोडता आला नाही. त्याचवेळी संघाला आगा सलमान, सॅम अयुब आणि सौद शकील या फिरकीवर अवलंबून राहावे लागले. आता पहिल्या कसोटीतून धडा घेत संघ व्यवस्थापनाने मनगटी फिरकी गोलंदाज अबरार अहमदचा दुसऱ्या कसोटीसाठी समावेश केला आहे.
पाकिस्तानचे १२ खेळाडू संभाव्य : अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, शान मसूद (क), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, अबरार अहमद, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अली, मीर हमजा.