

नवी दिल्ली : देशातील तरुणांमधील वाढती बेरोजगारी आणि अंमली पदार्थांचे सेवन या विषयावर युवक काँग्रेस बुधवारी (दि. १६) ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलन करणार आहे. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथून हे आंदोलन सुरू होणार असून देशातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचणार आहे. युवक काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष उदय भानू चिब यांनी नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी या आंदोलनाशी संबंधित एक पोस्टरही जारी केले.
उदय भानू चिब म्हणाले की, एकीकडे संपूर्ण देशात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, तर दुसरीकडे अमली पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे देशातील तरुणांना दुहेरी फटका बसत आहे. नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आणि परदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, उलट नोकऱ्यांऐवजी तरुणांना ड्रग्ज मिळाले आहेत. परदेशातून काळा पैसा येण्याऐवजी अमली पदार्थांचा प्रचंड साठा आला आहे. अमली पदार्थांचे व्यसन समाजासाठी घातक ठरत आहे, असेही चिब म्हणाले.
उदय भानू चिब म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत देशातील तरुणांची केवळ फसवणूक झाली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसतर्फे १६ ऑक्टोबर रोजी जंतर-मंतर, नवी दिल्ली येथून “नोकऱ्या द्या, ड्रग्ज नको” हे देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येत आहे. ही चळवळ देशातील प्रत्येक राज्य, जिल्हा आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचणार आहे. तरुणांमध्ये जागृती व्हावी आणि सरकारला गाढ झोपेतून जागे व्हावे यासाठी हे केले जात असल्याचे ते म्हणाले.