

नवी दिल्ली : बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले भाजप नेते नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय संसदीय मंडळाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या निवडीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचा उत्साह आणि समर्पण येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला बळकटी देईल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला आहे.
45 वर्षीय नितीन नवीन हे बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाममंत्री आहेत. नितीन नवीन यांचे वडीलदेखील भाजपचे वरिष्ठ नेते होते. नितीन नवीन यांच्या नियुक्तीनंतर गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळणार, अशी चर्चा देशभर सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व रचनेत बदल होत असतानाच्या काळात हा संघटनात्मक फेरबदल होत आहे. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या राजकीय टप्प्यावर पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची नियुक्ती पक्षाच्या आगामी संघटनात्मक रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे.
कोण आहेत नितीन नवीन?
नितीन नवीन भाजपचे निष्ठावान पदाधिकारीआहेत. यापूर्वीही त्यांनी बिहार सरकारमध्ये नगरविकास आणि गृहनिर्माण, कायदामंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे भाजपचे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या निधनानंतर 2006 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतून नितीन नवीन विधानसभेत आले. त्यानंतर त्यांनी सलग 4 वेळा बिहारमधील बांकीपूरची जागा जिंकली. 45 वर्षीय नितीन नवीन यांनी पक्षात कार्यकर्ता म्हणून, आमदार म्हणून, रस्ते बांधकाममंत्री म्हणून उत्तम काम केले. तरुण, उत्साही, सुस्वभावी आणि मेहनती नेता, अशी त्यांची ओळख आहे.