

संगीता चौधरी, पाटणा
बिहारच्या राजकारण, समाजकारणावर सर्वाधिक काळ आपली पकड कायम ठेवणार्या लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील अंतर्गत कलह यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उफाळून आला आहे. वंशजांमध्ये सुरू झालेली लढाई बहुतेकदा सर्वांनाच जखमी करूनच जाते, असे इतिहास सांगतो.
आरोप, प्रत्यारोप, अश्रू, संताप, प्रसंगी हाणामारी यातून अनेक घराण्यांची साम्राज्ये लयाला जातात. महाभारताच्या अखेरीस विजयी झालेले पांडवही राखेत उभे राहून ‘या विजयाची किंमत काय होती’ असा प्रश्न स्वतःला विचारत होते. आधुनिक काळात महाभारत अजून संपलेले नाही. राज्यागणिक, कुटुंबागणिक, पिढ्यान् पिढ्या ते आजही सुरूच आहे. फक्त नावे बदलत आहेत, काळ बदलत आहे, तंत्रज्ञान बदलते आहे; पण संघर्षाची कथा तशीच राहिली आहे. आज जे बिहारमध्ये घडते आहे, ते या अखंड परंपरेतील एक अध्याय आहे इतकेच!
भारतीय राजकारणामध्ये घराणेशाहीची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रदीर्घ काळानंतर जे सत्ता परिवर्तन झाले, त्यामध्ये घराणेशाहीचे अनेक प्रस्थापित गड अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. त्यानंतर झालेल्या बहुतांश निवडणुकांमध्ये भारतीय मतदारांनी राजकारणातील घराणेशाहीचा आलेला उबग स्पष्टपणाने दाखवून दिला, तरीही काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही कायम राहिलेली दिसून येते. बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब हे राजकीय घराणेशाहीचे मेरुमणी मानले जाते.
लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांनी 1973 मध्ये विवाह केला. त्यांना सात मुली आणि दोन मुले आहेत. बिहारच्या राजकारणात हे कुटुंब दीर्घकाळ प्रभावशाली राहिले आहे. प्रत्येक मुलाचे वैयक्तिक आयुष्य, शिक्षण, व्यवसाय तसेच राजकीय सहभाग वेगवेगळा आहे. या संपूर्ण कुटुंबाचे स्वरूप पाहिले, तर त्यात राजकारण, व्यवसाय, शिक्षण, परदेशातील वास्तव्य आणि वैयक्तिक मतभेद अशा अनेक पैलूंचे मिश्रण दिसते. लालूंची मोठी मुलगी मीसा भारती वैद्यकीय शिक्षण घेतलेली आहे आणि पाटलिपुत्र मतदारसंघातून खासदार म्हणून सक्रिय राजकारणात आहे. रोहिणी आचार्य या सिंगापूरमध्ये वास्तव्यास आहेत. चंदा सिंह या मुलीचा विवाह विक्रम सिंग या वैमानिकाशी झाला असून ती राजकीय प्रकाशझोतापासून दूरच राहिलेली आहे. रागिनी यादवने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले; पण अभ्यासक्रम पूर्ण केला नाही. तिचा विवाह समाजवादी पक्षाशी संबंधित असलेल्या राहुल यादव यांच्याशी झाला आहे. तिचे कुटुंबीय उत्तर प्रदेशच्या राजकारणाशी जोडलेले आहे. पाचवी मुलगी हेमा यादवने बीटेक शिक्षण घेतले असून तीही प्रसिद्धीपासून दूर आहे. तिचा विवाह विनीत यादव यांच्याशी झाला आहे. सहावी मुलगी अनुशका ‘धन्नू’ राव ही इंटेरियर डिझाईन आणि कायदा या क्षेत्रात शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. तिने हरियाणातील राजकीयद़ृष्ट्या सक्रिय कुटुंबातील चरनजीत रावशी विवाह केला आहे. लालू-राबडी दाम्पत्याची सर्वात लहान मुलगी राजलक्ष्मीबद्दल सार्वजनिक माहिती तुलनेने कमी आहे. मुलांमध्ये मोठा मुलगा तेज प्रताप यादव बारावीनंतरचे शिक्षण थांबवून राजकारणात सक्रिय झाला. त्याने बिहारमध्ये मंत्रिपदही भूषविले; पण 2025 मध्ये ‘बेजबाबदार वर्तन’ केल्याचा आरोप करत वडिलांनी त्याला सार्वजनिकरीत्या फटकारले आणि परिवार व पक्षातून बाहेर काढल्याची घोषणा केली. सर्वात लहान मुलगा तेजस्वी यादव हा मात्र लालूंचा राजकीय वारसदार मानला जातो. त्याने नववीनंतर औपचारिक शिक्षण सोडले; पण बिहारच्या राजकारणात अत्यंत प्रभावी नेता म्हणून उदयास आला. तेजस्वींनी मागील काळात उपमुख्यमंत्री म्हणूनही कार्यभार पाहिलेला आहे आणि तो आजही पक्षाचा प्रमुख चेहरा आहे. त्याचा विवाह राजश्री यांच्याशी झाला असून त्यांना दोन मुले आहेत.
लालूंचा राजकीय प्रवास विद्यार्थी नेता म्हणून सुरू झाला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सहभागी होत त्यांनी आपली ओळख निर्माण केली. 1990 च्या दशकात उदयाला आलेल्या यादव शक्तीचा, सामाजिक न्यायाच्या चळवळीचा आणि मंडल राजकारणाचा चेहरा म्हणून लालूंचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला. आपले होमग्राऊंड असणार्या बिहारमध्ये तर त्यांनी राजकीय अक्षच आपल्या बाजूने पलटवला. गरीब, दलित, मागास, अल्पसंख्याक यांच्या भावविश्वात ते ‘मसिहा’ बनले. यादव-मुस्लीम हे समीकरण पुढे राष्ट्रीय जनता दलाची हक्काची मतपेढी बनले; परंतु त्याचवेळी भ्रष्टाचाराचे आरोप विशेषतः चारा घोटाळा लालूंना थेट कारागृहापर्यंत घेऊन गेले. त्यानंतर लालूंनी आपल्या पत्नी राबडीदेवी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले. पुढे तेजप्रताप यादव यांना 2015 च्या महागठबंधन सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले; परंतु त्यांची राजकीय पकड, गांभीर्य आणि प्रशासकीय क्षमता याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याच काळात तेजस्वी यादव यांचा उदय सुरू झाला. तरुण, सुसंस्कृत, संघटित आणि महत्त्वाकांक्षी असलेल्या तेजस्वींनी लवकरच आरजेडीचा वारसा आपल्या हातात केंद्रित केला. लालूंच्या अनुपस्थितीत पक्षाची सूत्रे पूर्णतः त्यांच्याकडे आली आणि 2020 नंतर तेच राजदचा निर्विवाद चेहरा बनले. परिणामी, तेजप्रताप अधिकाधिक एकाकी झाले आणि कुटुंबातील त्यांच्या प्रभावाची जागा लहान होत गेली. गतवर्षीच्या प्रेमप्रकरणाने त्यांची कुटुंबातून गच्छंती झाली, तरीही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले नशीब आजमावून पाहिले; पण मतदारांनी त्यांना साफ नाकारले. सिंगापूरमध्ये स्थायिक असणार्या रोहिणी आचार्य यांनी आपल्या वडिलांना स्वतःची एक किडनी दान केल्याची घटना मध्यंतरी बरीच गाजली. रोहिणी या कुटुंबातील भावनिक आणि नैतिक केंद्र मानल्या जात होत्या. परंतु त्या जेव्हा जेव्हा बिहारच्या राजकारणात पाऊल टाकत, तेव्हा घराण्यात ताण निर्माण होत असे. कारण त्यांची लोकप्रियता, तडफदार बोलणे आणि सरळवृत्ती यामुळे पक्षातील काही गटांना त्या भविष्यात ‘तेजस्वीच्या बरोबरीची’ व्यक्ती बनू शकतात अशी भीती निर्माण झाली. ही भीतीच आज लालूंच्या कुटुंबातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली.
लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये रोहिणीला कधी समर्थन, कधी रोखणे, कधी प्रचार मर्यादित करणे अशी गुंतागुंत सतत दिसत गेली. तेजस्वींचे मुख्य सल्लागार आणि मनोमनी ‘पॉवर सेंटर’ बनलेल्या संजय यादव यांनी त्यांना अनेक वेळा राजकारण सोडून सिंगापूरला परत जाण्यास सांगितल्याचे आरोप स्वतः रोहिणीने केले. पक्षातील गटबाजी, प्रचारातील अडथळे, आणि भावंडांमधील वाढत गेलेले अविश्वासाचे वातावरण या सगळ्यांमुळे आज लालूंच्या कुटुंबामध्ये यादवी माजल्याचे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी तेजप्रताप यादव यांचे प्रताप समोर आले होते. आता निवडणुकीनंतरची बैठक शेवटची ठिणगी ठरली. रोहिणी आणि तेजस्वी यांच्यातील गरमागरम वाद, त्यातील अपमानास्पद भाषा आणि त्यातून रोहिणीचे ‘कुटुंबाशी सर्व संबंध तोडत आहे’ हे विधान लालूंच्या गृहकलहनाट्यात भूकंप घडवणारे ठरले. स्वतः लालू यादव हे वय, आजारपण आणि दोषसिद्धीमुळे निर्णायक भूमिकेत राहिले नाहीत; त्यामुळे कुटुंबातील संघर्ष मध्यस्थीशिवाय अधिकच वाढत गेला. तेजस्वी यादव पक्षाला स्थिर करण्यासाठी धडपडत असल्याचे सांगितले जात असले तरी कुटुंबातील फुट वाढत आहे.
एकेकाळी लालूंचे घराणे हे भारतीय राजकारणातील सर्वात मजबूत आणि सर्वात भावनिक घराण्यांपैकी एक होते. परंतु अनेक भारतीय घराण्यांप्रमाणेच येथेही वारसा, अहंकार, महत्त्वाकांक्षा, निष्ठा आणि सत्ताकेंद्र यांवरील संघर्षाने घराणे कमकुवत होत गेले. ज्या कुटुंबाने बिहारचे राजकारण दशकानुदशके आकारले, ते आता स्वतःच्या अंतर्गत मतभेदांनी कोलमडण्याच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. या संघर्षाचे पुढे काय होईल, लालूंच्या कुटुंबामध्ये पुनर्मिलन होईल का, पक्षाचे औपचारिक विभाजन होईल का हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल. बिहारमधील सत्ता तेजस्वींना मिळाली असती तर सत्तेच्या लोहचुंबकामुळे कदाचित ही नाती घट्ट चिकटून राहिलीही असती; पण आता खुद्द तेजस्वींपुढेच आपल्या भवितव्याचे आव्हान उभे राहिले आहे.
भारतीय राजकारणात ज्याप्रमाणे घराणेशाहीची परंपरा दीर्घकाळ राहिलेली दिसून येते, तशाच प्रकारे या राजकीय घराण्यांना फाटाफुटीचा, अंतर्गत कलहांचा जणू शापच असल्याचेही दिसून आले आहे. महाराष्ट्रात पवार, ठाकरे, महाजन, मुंडे कुटुंबांमधील अंतर्गत संघर्ष आपण पाहिला आहे. उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यादव यांच्या कुटुंबातील संघर्षही बराच गाजला होता. भारतीय इतिहास आणि पुराणकथांमध्येही अशी असंख्य उदाहरणे आढळतात. त्यांचा लसावि काढला असता, अशा नाट्यपूर्ण संघर्षांना टाळणे जवळजवळ अशक्य असल्याचे दिसते. वारसाहक्काची लढाई ही जगभरातील राजकीय घराण्यांमध्ये आणि व्यावसायिक साम्राज्यांमध्ये सतत उसळत राहणारी आहे. सत्ता, वारसा, अहंकार आणि मालकी या प्रश्नांवर बहुतांश कुटुंबांचे विभाजन झाले आहे. सत्तेचे पिढीजात संक्रमण महत्वाचे असले तरी ते तितकेच घातक असते. वंशजांमध्ये सुरू झालेली लढाई बहुतेकदा सर्वांनाच जखमी करूनच जाते असे इतिहास सांगतो. आरोप, प्रत्यारोप, अश्रू, संताप, प्रसंगी हाणामारी यातून अनेक घराण्यांची साम्राज्ये लयाला जातात. महाभारताच्या अखेरीस विजयी झालेले पांडवही राखेत उभे राहून ‘या विजयाची किंमत काय होती’ असा प्रश्न स्वतःला विचारत होते. आधुनिक काळात महाभारत अजून संपलेले नाही. राज्यागणिक, कुटुंबागणिक, पिढ्यानपिढ्या ते आजही सुरूच आहे. फक्त नावे बदलत आहेत, काळ बदलत आहे, तंत्रज्ञान बदलते आहे; पण संघर्षाची कथा तशीच राहिली आहे. आज जे बिहारमध्ये घडते आहे, ते या अखंड परंपरेतील एक अध्याय आहे इतकेच !