

Nitin Gadkari QR Code On Highway:
रस्ते बांधकाम आणि त्यातील गुणवत्ता याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात अत्यंत परखड आणि कठोर विधान केले आहे. महामार्गांच्या बांधकामातील निकृष्टतेबद्दल जनतेच्या रोषाला आणि माध्यमांवरील टीकेला (शिव्यांना) फक्त आपल्यालाच का सामोरे जावे लागते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर, त्यांनी आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर क्यूआर कोड (QR Code) असलेले मोठे होर्डिंग्ज लावण्याचे आदेश दिले आहेत.
नितीन गडकरी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात भाषण करताना आपली भूमिका स्पष्ट केली. रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यास समाज माध्यमांवर आणि पत्रकार फक्त माझा फोटो छापतात आणि मलाच टीकेला सामोरे जावे लागते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नितीन गडकरी म्हणाले, "मी एकटाच का शिव्या खाऊ? खराब रस्त्यांसाठी कंत्राटदाराचा फोटो, सल्लागाराचा फोटो आणि सचिवासह कार्यकारी अभियंत्यांचा फोटोही छापला जावा. त्यांच्यावरही टीका व्हायला हवी. सगळे माझ्याच गळ्याला का लटकतात? सोशल मीडियावर मीच का उत्तर देत बसू? त्यामुळे आता ही सर्व माहिती जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय मी घेतला आहे."
रस्त्यांच्या कामात पारदर्शकता (Transparency) आणण्यासाठी आणि प्रत्यक्ष जबाबदारी निश्चित करण्यासाठी गडकरींनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
या नव्या नियमानुसार, रस्त्यावर लावण्यात आलेल्या प्रत्येक क्यूआर कोड होर्डिंगवर प्रवाशांना संबंधित कंत्राटदार (Contractor), सल्लागार (Consultant), कार्यकारी अभियंता (Executive Engineer), आणि विभागाचे सचिव (Secretary) यांची नावे, संपर्क क्रमांक आणि फोटो उपलब्ध होणार आहेत.
महामार्गावरून प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती हा क्यूआर कोड स्कॅन करून रस्त्याच्या बांधकामासाठी कोण जबाबदार आहे, याची माहिती त्वरित मिळवू शकेल.
गडकरींच्या या आदेशामुळे आता रस्ते बांधकामातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित होणार असून, कामाच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांवर थेट कारवाईचा मार्ग मोकळा होणार आहे.