

Road Accident : आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात आंब्याने भरलेल्या ट्रकला भीषण अपघात झाला. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेत नऊ जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू . मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून अपघाताच्या कारणांची माहिती मागवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंब्याने भरलेला ट्रक राजमपेट मंडळातील थल्लापाका गावातून कोडूरकडे जात होता. या ट्रकमध्ये आंब्याच्या भरलेल्या पेट्यांवर मजूर बसले होते. राष्ट्रीय महामार्ग ७१६ वर रेड्डीपल्ली तलावाच्या बंधाऱ्यावर चढत असताना हा ट्रक पलटी झाला. ट्रक डाव्या बाजूला पलटी होताच, त्यावर बसलेले मजूर खाली पडले, अशी माहिती अन्नमय्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व्ही. विद्यासागर नायडू यांनी 'पीटीआय'ला दिली. १२ जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना कडप्पा जिल्ह्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर इतरांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. "चालकाने बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. माझी पत्नी आणि इतर जण वाहनाखाली अडकून जागीच ठार झाले," असे तक्रारदार एन. शिव कुमार यांनी आपल्या पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जखमींना उत्तम वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. "कामावरून घरी परतत असताना गरीब मजुरांनी आपले प्राण गमावणे हे हृदयद्रावक आहे. सरकार मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील," असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्यपाल एस. अब्दुल नझीर यांनीही या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. "या भीषण अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला तीव्र दुःख झाले आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना, आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो," असे नझीर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.