

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसराजवळील कार स्फोट प्रकरणाच्या तपासात घटनास्थळावरून जप्त केलेली तीन काडतुसे (दोन जिवंत आणि एक रिकामे) 9 एमएम कॅलिबरची आहेत. लष्करासाठी वापरल्या जाणाऱ्या या गोळ्या नागरिकांच्या ताब्यात ठेवण्यास प्रतिबंधित आहे. दरम्यान, 10 डिसेंबरला घडलेल्या स्फोटासाठी वापरलेली गाडी उमर नबीच चालवत असल्याचे डीएनए चाचणीवरून स्पष्ट होत आहे. या स्फोटासाठी उमर नबीला कार घेऊन देणारा आमीर रशीद अली याला एनआयएने ताब्यात घेतले.
एनआयएने आतापर्यंत जखमींसह 73 साक्षीदार तपासले आहेत. आमीर कार खरेदी करून देण्यासाठी काश्मिरातील पंपोरे येथून दिल्लीत आला होता. त्याला आत्मघाती स्फोटाची कल्पना होती. स्फोटानंतर काही तासांतच जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून एनआयएने ताबा मिळवला.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या काडतुसांचा वापर सहसा सशस्त्र दलांकडून किंवा विशेष परवानगी असलेल्या व्यक्तींकडूनच केला जातो. घटनास्थळी कोणतेही पिस्तूल किंवा त्याचे कोणतेही भाग आढळले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा दारूगोळा स्फोटस्थळी कसा पोहोचला आणि संशयितांच्या ताब्यात तो होता का, याचा तपास आता अधिकारी करत आहेत. या नव्या खुलाशामुळे तपासाला एक नवीन दिशा मिळाली आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटात गाडी चालवणारी व्यक्ती उमर नबीच होती, हे न्यायवैद्यक पुराव्यांनी निश्चित केले आहे. या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले होते. गाडीच्या एक्सलरेटरजवळ जळालेला पायाचा काही भाग आणि गाडीच्या ढिगाऱ्याजवळ सापडलेला एक काळा स्पोर्ट शू या महत्त्वपूर्ण पुराव्यांवर तपासकर्त्यांनी भर दिला. स्फोटात ह्युंदाई आय-20 कार पूर्णपणे नष्ट झाली होती. फॉरेन्सिक पथकांना चालकाच्या बाजूला सापडलेल्या पायाच्या खालच्या भागाचे डीएनए नमुने तपासणीसाठी एम्स येथे पाठवले होते. बुधवारी झालेल्या तपासणीत हे नमुने उमरच्या आईच्या नमुन्यांशी जुळले, ज्यामुळे तोच गाडी चालवत असल्याचे निश्चित झाले आहे. स्फोटाच्या ठिकाणी मिळालेला स्पोर्ट शू हा उमरने त्या दिवशी लाल किल्ल्याकडे जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये परिधान केलेल्या बुटाशी जुळत होता. हा पुरावा महत्त्वाचा आहे. कारण स्फोटाच्या वेळी उमरच आय-20 चालवत होता हे वैज्ञानिकरीत्या सिद्ध होते, असे सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणाशी संबंधित घडामोडींमध्ये नॅशनल मेडिकल कमिशनने जम्मू-काश्मीरमधील चार डॉक्टरांची नोंदणी तत्काळ प्रभावाने रद्द केली आहे. डॉ. मुझफ्फर अहमद, डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद यांचा त्यात समावेश आहे. डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद यांना यापूर्वीच दहशतवादी प्रकरणांशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.तसेच तपास यंत्रणांनी खुलासा केला आहे की, जवळपास आठ संशयित आरोपी चार वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. प्रत्येकाकडे अनेक सुधारित स्फोटक उपकरणे होती.
स्फोटाचे स्वरूप : 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळील स्फोटात 12 जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले.
नवीन एफआयआर : घटनेच्या आदल्या दिवशीच गुन्हेगारी कटअंतर्गत नवीन तक्रार नोंदवण्यात आली.
सुरक्षा वाढवली : ऐतिहासिक स्मारकाच्या आसपासची सुरक्षा व्यवस्था या घटनेनंतर अधिक कडक करण्यात आली.
मुख्य सूत्रधार : डॉ. उमर नबी यानेच हा कार स्फोट घडवल्याचे डीएनए चाचणीतून निश्चित झाले असून त्याचे डीएनए नमुने त्याच्या आईच्या डीएनएशी जुळले आहेत.