

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणात 20 जणांची नावे समोर आली आहेत. यामध्ये दहशतवादी डॉक्टरांची फौज आणि त्यांना मदत करणार्या स्लीपर सेल मॉड्यूलच्या संशयितांचा समावेश आहे. डॉक्टरांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादाच्या मार्गावर आणणारे दोन मौलवीही जम्मू-काश्मीर आणि फरिदाबाद पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
दिल्ली स्फोट प्रकरणातील डॉक्टरांच्या दहशतवादी मॉड्यूलच्या संपर्कात असलेल्या डॉ. सज्जादलाही पकडण्यात आले आहे. अटकेच्या दोन दिवस आधीच सज्जादचे लग्न झाले होते. तो डॉ. उमर आणि मुझम्मिलच्या संपर्कात होता.
अल-फलाह विद्यापीठाच्या कॅम्पसमधील आणखी एका डॉक्टरची चौकशी सुरू आहे. ही एक एमबीबीएसची विद्यार्थिनी असून, ती डॉ. निसारची मुलगी आहे. डॉ. निसार 2023 पर्यंत काश्मीरमध्ये होता आणि त्याला बडतर्फ करण्यात आले होते.
डॉ. आदिल, अनंतनागचा डॉक्टर आदिल हा अनंतनागचा सीनिअर डॉक्टर आहे. आदिलने 19 ऑक्टोबर रोजी श्रीनगरमध्ये जैशचे पोस्टर लावले होते. सहारनपूरमधून 6 नोव्हेंबरला त्याला अटक झाली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या अंसार गजावत-उल-हिंदचा खास हस्तक यासिर यालाही अटक करण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की, यासिरनेच डॉ. आदिल मोहम्मद राठर, डॉ. मुझम्मिल आणि उमर यांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील होण्यासाठी तयार केले.
फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात डॉ. मुजम्मिलला मदत करणारी आणि जैश-ए-मोहम्मदच्या महिला विंगची जबाबदारी सांभाळणार्या डॉ. शाहीनचा भाऊ डॉ. परवेझ अन्सारी यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तो डॉ. शाहीनचा सख्खा धाकटा भाऊ आहे.
फरिदाबादमधून अटक झालेल्या डॉक्टर शाहीनवर जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील महिला विंग आणि भरतीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जमात-उल-मोमिनात ही जैशची महिला विंग आहे.
आदिलने दिलेल्या माहितीवरून जम्मू-काश्मीर आणि हरियाणा पोलिसांच्या पथकाने डॉ. मुजम्मिलला पकडले. फरिदाबादच्या धौज परिसरातील त्याच्या खोलीतून 360 किलो स्फोटके, रायफल्स आणि टाइमर जप्त करण्यात आले.
दिल्ली स्फोटातील कारचालक हल्लेखोर डॉ. उमर मोहम्मद असल्याचे सांगितले जात आहे. उमर फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात शिकवत होता. उमर हाच तो संशयित हल्लेखोर होता, ज्याने लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कार थांबवून स्फोट घडवला. पुलवामाचा रहिवासी असलेला उमर नबी, मुझम्मिलसोबत तुर्कीलाही गेला होता. उमरने एमडी मेडिसिनचे शिक्षण घेतले होते. श्रीनगर आणि अनंतनागमध्ये सीनिअर रेसिडेंट म्हणून काम केल्यानंतर तो फरिदाबादला स्थायिक झाला.