

नवी दिल्ली : सत्य निकेतन येथील इमारत कोसळण्याच्या भीषण दुर्घटनेला महिना उलटत नाही तोच राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. पूर्व दिल्लीतील सीमापुरी भागात बुधवारी दुपारी एक ३ मजली जुनी, जीर्ण इमारत अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून, ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साधारण ३:३२ वाजता अग्निशामक दलाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ गाड्या, स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ही इमारत तळमजला अधिक तीन मजली होती.
स्थानिक प्रशासनाकडून सध्या युद्धपातळीवर बचावकार्य (रेस्क्यू ऑपरेशन) सुरू आहे. ढिगारा बाजूला करण्याचे काम वेगाने केले जात असून, आत नेमके किती लोक अडकले आहेत याची अचूक माहिती अद्याप समोर आलेली नाही. जखमी झालेल्या दोघांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ही इमारत बऱ्याच काळापासून जीर्ण अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.