

नवी दिल्ली: केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी योजना (MGNREGA) म्हणजेच मनरेगा चे नाव बदलण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी योजनेचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' ठेवले जाण्याची शक्यता आहे. मनरेगा योजना ग्रामीण भागातील लोकांना रोजगार पुरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला एक महत्त्वाचा सरकारी उपक्रम आहे.
मनरेगा कायदा ऑगस्ट 2005 मध्ये पास करण्यात आला, ज्यानुसार कामाचा अधिकार मिळतो. एप्रिल 2008 पासून ही योजना संपूर्ण भारतात लागू झाली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला 100 दिवसांचा रोजगार देण्याची तरतूद आहे. योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असते. रोजगार शोधणाऱ्यांना पाच किलोमीटरच्या परिघात काम दिले जाते आणि त्यासाठी किमान वेतन दिले जाते. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत काम न मिळाल्यास त्याला बेरोजगारी भत्ता देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.
मनरेगा योजना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. गेल्या काही वर्षांत या योजनेसाठीच्या निधीत लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये मनरेगाचा निधी ३३,००० कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये हा निधी वाढून ८६,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या योजनेच्या नामकरणाबाबत सरकार लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. नामकरणाचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी उच्च स्तरावर विचाराधीन असल्याचे समजते.