पुढारी ऑनलाईन डेस्क : महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक सरकारी आणि वित्तीय संस्था आपल्या नियमांमध्ये बदल करतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. ऑगस्ट महिन्यात कोणते बदल होणार हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. १ ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींपासून गुगल मॅप सेवा आणि क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत.
गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. या महिन्यात मात्र सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांकडून आता थर्ड पार्टी पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व रेंटल ट्रान्झॅक्शनच्या व्यवहारांवर एक टक्का रक्कम आकारली जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी कमाल मर्यादा तीन हजार रुपये असेल. पेटीएम, क्रेड, मोबिक्विकसारख्या थर्ड पार्टी पेमेंट अॅप्सचा वापर करून अनेकदा रेंटल ट्रान्सॅक्शन करण्यात येतात.
गुगल मॅप्स इंडियामध्ये महत्त्वपूर्ण बदल करत आहे. अधिकाधिक सेवा पुरवठादारांना गुगल मॅप्स वापरता यावा, यासाठी पुढील महिन्यापासून कंपनी आपला सर्व्हिस चार्ज ७० टक्क्यांनी कमी करणार आहे.
फास्टॅगचे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. फास्टॅगची केवायसी बंधनकारक असेल. या नियमांमध्ये तीन ते पाच वर्षापेक्षा जुन्या फास्टॅगसाठी केवायसी अपडेट करणे आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत पाच वर्षापेक्षा जुन्या फास्टॅगमध्ये बदल करणे यांचा समावेश आहे.