

nepal koshi earthquake depth of 10 km richter scale magnitude
पुढारी ऑनलाईन : बिहारमधील समस्तीपूर, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी आणि नेपाळच्या कोशी प्रांतात मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी नोंदवण्यात आली. सुदैवाने, अद्याप कोणतीही मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
बिहारमधील समस्तीपूर येथे मंगळवारी सकाळी सुमारे ७ वाजून ४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. हे धक्के सुमारे २ सेकंदांपर्यंत जाणवले. अनेक वर्षांनंतर समस्तीपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने पहाटेच्या वेळी अनेक नागरिकांना नेमके काय घडले, हे सुरुवातीला समजले नाही.
सकाळच्या थंडीच्या वातावरणात अनेक नागरिक घरातच असताना अचानक ७ वाजून ४ मिनिटांनी जमीन हादरली. दरम्यान, पश्चिम बंगालमधील सिलिगुडी, दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कूचबिहारसह उत्तर बंगालमधील अनेक भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले.
मंगळवारी नेपाळच्या कोशी प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या (EMSC) माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी नोंदवण्यात आली. सध्या तरी कोणतीही मोठी वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भूतान, बांगलादेश आणि चीनमध्येही धक्के जाणवण्याची शक्यता
पूर्व नेपाळमध्ये सकाळी सुमारे ७ वाजून २ मिनिटांनी भूकंप झाला. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू सिक्कीमच्या सीमेजवळ नेपाळच्या कोशी प्रांतातील ताप्लेजुंग जिल्ह्यात होता. लेलेप गावापासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे.
नेपाळसह भारत, भूतान, बांगलादेश आणि चीनमधील काही भागांतही भूकंपाचे धक्के जाणवले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेपाळ आणि त्याच्या आसपासचा हिमालयीन प्रदेश भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. कोशी प्रांत हा पूर्व नेपाळचा भाग असून, त्याची सीमा भारतातील काही प्रदेशांच्या जवळ आहे.