

नवी दिल्ली / काठमांडू; वृत्तसंस्था : काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागळे यांची जाहीर प्रशंसा केली आहे. नेपाळसमोरील आर्थिक आव्हाने आणि विकासाच्या शक्यतांवर वागळे यांनी अत्यंत विचारपूर्वक मांडणी केल्याने थरूर त्यांच्या कार्यशैलीने विशेष प्रभावित झाले आहेत. नेपाळच्या अर्थमंत्र्यांचे 'वागळे' हे महाराष्ट्रीयन आडनाव पाहून थरूर यांचे कुतूहल जागे झाले असता, स्वतः स्वर्णिम वागळे यांनी आपला कुलइतिहास उलगडून सांगितला. त्यांचे पूर्वज तब्बल ८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून नेपाळमध्ये जाऊन स्थायिक झाले होते.
शशी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या भेटीबाबत माहिती दिली. थरूर यांनी लिहिले, नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागळे यांच्या भेटीने मी अत्यंत प्रभावित झालो आहे. त्यांनी आपल्या देशासमोरील आर्थिक आव्हाने आणि शक्यतांवर अतिशय सखोल चर्चा केली. मला त्यांच्या वागळे या महाराष्ट्रीयन आडनावाबद्दल विशेष उत्सुकता होती. त्यावर त्यांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज तब्बल ८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून नेपाळमध्ये जाऊन स्थायिक झाले होते.
नेपाळच्या सरकारमध्ये नव्या पिढीचे नेतृत्व
काँग्रेस खासदारांनी पुढे म्हटले की, नेपाळच्या नव्या सरकारमध्ये अत्यंत हुशार, उच्चशिक्षित आणि व्यावसायिक मंत्र्यांची नवी पिढी कार्यरत आहे. पेशाने ख्यातनाम अर्थतज्ज्ञ असलेले स्वर्णिम वागळे हे याच सक्षम पिढीचे प्रतिनिधित्व करतात. या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र स्नेहभोजनही केले.