

NEET UG paper leak
नवी दिल्ली: NEET UG पेपरफुटी प्रकरणातील आरोपी यश यादव याने 21 जून रोजी होणारी NEET UG पुनर्परीक्षा देण्यासाठी अंतरिम जामीन मिळावा, अशी मागणी केली होती. मात्र त्याला अद्याप परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले नसल्याने दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने या मागणीवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 जून रोजी होणार आहे.
यश यादवने परीक्षेला बसण्यासाठी अंतरिम जामीन देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. तसेच बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठीही त्याने जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. या अर्जावर सुनावणी करताना विशेष CBI न्यायाधीश अजय गुप्ता यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून उत्तर मागवले होते.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, यादवला अद्याप NEET UG परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्यात आलेले नाही. तसेच आरोपी असतानाही त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी मिळेल का, याबाबत राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून खात्री करण्यात आली आहे का, असा प्रश्नही न्यायालयाने बचाव पक्षाला विचारला.
यापूर्वी 2 जून रोजी न्यायालयाने यश यादवला कोठडीत असताना NEET UG परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासाची पुस्तके ठेवण्याची परवानगी दिली होती. 21 जूनला परीक्षा असल्यामुळे अभ्यास साहित्याची आवश्यकता असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले होते.