नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर २४ जूनपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. तर अधिवेशनादरम्यान २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षांची निवड होऊ शकते. या पार्श्वभूमीवर दिल्लीत लोकसभा अध्यक्ष कोण होणार? यावर एनडीएमध्ये मंथन सुरू आहे. यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी रविवारी (दि.१६) एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्षपदावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकार स्थापनेनंतर एकीकडे मंत्रिमंडळाने कामाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे पुढील काळात अधिवेशनासह विविध रणनीतींबाबत बैठकांचे सत्रही एनडीएमध्ये सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या घरी झालेल्या बैठकीला भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू , संयुक्त जनता दलाचे लालन सिंग, लोजपचे चिराग पासवान उपस्थित होते.
१८ व्या लोकसभेत इंडिया आघाडी देखील लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. जर तेलगू देसम पक्षाने आपला उमेदवार दिला तर आम्ही उमेदवार देणार नाही, या भूमिकेत इंडिया आघाडी आहे. मात्र तेलगु देसम पक्ष उमेदवार देणार नाही, असे चित्र आहे. असे असले तरी भाजपने दिलेला उमेदवार आमच्या पसंतीचा असावा, अशी अपेक्षा तेलगू देसम पक्षाला आहे. एनडीएकडून भाजपचाच उमेदवार लोकसभा अध्यक्ष पदासाठी असेल हे जवळजवळ निश्चित आहे. संयुक्त जनता दलाचे नेते के. सी. त्यागी यांनीही तसे वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधकांनी उमेदवार दिल्यास ही निवडणूक चुरशीची तर होईलच मात्र भाजपासाठी आव्हानात्मकही होण्याची शक्यता आहे.