

नवी दिल्ली : भाजपचे वरिष्ठ नेते सीपी राधाकृष्ण यांची देशाच्या नव्या उपराष्ट्रपतीपदी निवड करण्यात आली आहे. संसदेतील निवडणूक प्रक्रियेत त्यांचा विजय निश्चित झाल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. ते 452 मतांनी विजयी झाले.
देशाच्या १७ व्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज संसद भवनात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. एकूण ७६८ खासदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय संसदेत लोकसभा आणि राज्यसभेसह एकूण ७८८ खासदार आहेत. सध्या दोन्ही सभागृहात ७ जागा रिक्त आहेत. अशाप्रकारे एकूण ७८१ खासदारांना मतदान करायचे होते, त्यापैकी १३ जणांनी मतदानात भाग घेतला नाही. यापैकी बीआरएसचे ४, बीजेडीचे ७, अकाली दलाचे १ आणि १ अपक्ष खासदाराने मतदान केले नाही. ४२७ एनडीए खासदारांनी मतदान केले.
सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम मतदान केले. मतदान सुरू होण्यापूर्वी सर्व एनडीए खासदारांनी सकाळी ९.३० वाजता बैठकीत भाग घेतला. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आणि इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होती.
एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. मतमोजणीच्या वेळी ७५२ मते वैध आढळली आणि १५ मते अवैध घोषित करण्यात आली. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ पहिल्या पसंतीची मते मिळाली, तर इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना फक्त ३०० पहिल्या पसंतीची मते मिळाली.
विरोधी पक्ष आपल्या खासदारांना एकजूट ठेवू शकला नाही. एनडीएकडे एकूण ४२७ खासदार होते. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाच्या वायएसआर काँग्रेसच्या सर्व ११ खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान केले तर ही संख्या ४३८ पर्यंत पोहोचते. परंतु सीपी राधाकृष्णन यांना एकूण ४५२ मते मिळाली. म्हणजेच १४ विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूने क्रॉस-व्होटिंग केले.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर असलेल्या सी. पी. राधाकृष्णन यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना पराभूत करून सी. पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती झाले. आतापर्यंत सी. पी. राधाकृष्णन यांच्या राजकीय प्रवासाचा मागोवा.
नाव : चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन
जन्म तारीख : ४ मे १९५७
जन्म स्थान : तिरुपूर, तमिळनाडू
सीपी राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूसह देशाच्या विविध भागात राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक परिचित व्यक्तिमत्व राहिले आहे.
वयाच्या १६ व्या वर्षी सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जीवनाची सुरुवात केली.
१९७४ मध्ये भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य झाले.
१९९६ मध्ये त्यांना तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
१९९८ मध्ये ते पहिल्यांदा तमिळनाडूमधील कोइंबतूर येथून लोकसभेवर निवडून आले.
१९९९ मध्ये ते पुन्हा एकदा कोइंबतूर लोकसभेवर निवडून आले.
आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.
२००४ साली सी. पी. राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते. २००४ ते २००७ पर्यंत ते तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते.
या पदावर असताना त्यांनी ९३ दिवसांची ‘रथयात्रा’ काढली होती. या रथयात्रेने १९००० किमी प्रवास केला. भारतातील सर्व नद्यांना जोडावे, दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे, समान नागरी कायदा लागू करावा, अस्पृश्यता निर्मूलन आणि अंमली पदार्थांचे उच्चाटन व्हावे या मागण्यांसाठी ही रथयात्रा काढली होती. त्यानंतर देखील त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी दोन पदयात्रांचे नेतृत्वही केले.
२०१६ मध्ये सी. पी. राधाकृष्णन हे कोची येथील कॉयर (नारळ फायबर) बोर्डाचे अध्यक्ष झाले. त्यांनी ४ वर्षे हे पद भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातून नारळाच्या तागाची निर्यात २,५३२ कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली.
२०२० ते २०२२ पर्यंत ते केरळ भाजपचे प्रभारी देखील होते.
१२ फेब्रुवारी २०२३ रोजी झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. नियुक्तीनंतर पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व २४ जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता.
नंतर १९ मार्च २०२४ रोजी त्यांना तेलंगणा आणि पुद्दुचेरीचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.
२७ जुलै २०२४ रोजी त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करण्यात आले.
१७ ऑगस्ट २०२५ रोजी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सी. पी. राधाकृष्णन हे एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील ही घोषणा केली.
उत्तम क्रीडापटू असलेले, राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चाम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे.
सी. पी. राधाकृष्णन यांनी आजवर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.