

NDA CM Meet : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज (दि.२५) बैठक झाली. यावेळी 'ऑपरेशन सिंदूर' राबविणार्या भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी नेतृत्वाचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी जातीय जनगणनेवर चर्चा झाली. तसेच जातीय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला सुमारे १९ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान, नेत्यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचे पहिले मन की बात भाषण ऐकले. शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की 'ऑपरेशन सिंदूर'मुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला आहे. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच सशस्त्र दलांना पाठिंबा दिला आहे. आहे. 'ऑपरेशन सिंदूर' ने दहशतवाद्यांना आणि त्यांच्या प्रायोजकांना योग्य उत्तर दिले आहे.'
एनडीए मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करणार्या भाजप नेत्यांनी सांगितले की, बैठकीत जातीय जनगणना, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला वर्धापन दिन आणि सुशासन या मुद्द्यांवर चर्चा झाली. या परिषदेतील चर्चेचा एक महत्त्वाचा भाग विविध एनडीए राज्य सरकारांनी स्वीकारलेल्या सर्वोत्तम पद्धतींवर केंद्रित होता. अनेक मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यांच्या प्रमुख योजनांवर सादरीकरणे केली. बैठकीत २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
२०४७ मध्ये विकसित भारत साध्य करण्यासाठीच्या दृष्टिकोन आणि धोरणात्मक कृती आराखड्यावर चर्चा करण्यासाठी एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेत वैयक्तिक राज्ये कशी अर्थपूर्ण योगदान देऊ शकतात हा चर्चेचा विषय आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी नीती आयोगाची बैठक घेतली होती. यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील विकासाला गती देण्यासाठी राज्यांना केंद्रासोबत एकत्र यावे, राज्यांनी राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत परंतु स्थानिक वास्तवावर समावेशक आणि दूरदृष्टी असलेले दृष्टिकोन दस्तऐवज तयार केले पाहिजेत, असे आवाहनही केले हाेते.