

नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाने उल्लू अॅपच्या हाऊस अरेस्ट या कार्यक्रमामधील व्हायरल व्हिडिओ सामग्रीची स्वतःहून दखल घेत उल्लू अॅपच्या सीईओंना समन्स बजावले आहे. या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेत आयोगाने उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि अजाज खान यांना ९ मे २०२५ रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे नोटीस बजावले आहे आणि कारवाईचा इशारा दिला आहे.
आयोगाने म्हटले की, २९ एप्रिल २०२५ रोजीच्या या शोमधील एक क्लिप व्हायरल झाली, यामध्ये होस्ट अजाज खान या शोमध्ये सहभागी महिलांना कॅमेऱ्यासमोर अश्लील गोष्टी करण्यास सांगत आहेत. या गोष्टीला सहभागी महिलांचा नकार होता तसेच त्यांच्यामध्ये याबाबत अस्वस्थता असूनही त्यांना तसे सांगितले गेले. कंटेंट निर्मिती किंवा डिजिटल मनोरंजनाच्या नावाखाली महिलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जाईल, अशा ठिकाणी आयोग कठोर कारवाई करेल, असेही आयोगाने म्हटले.
राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले की, अशा प्रकारची अश्लील सामग्री केवळ महिलांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करत नाही तर ऑनलाइन मनोरंजनाच्या नावाखाली एक अत्यंत हानिकारक उदाहरण स्थापित करते. मनोरंजनाच्या नावाखाली लैंगिक बळबजरीला प्रोत्साहन देते आणि वयानुसार योग्य सेन्सॉरशिप मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात अपयशी ठरते. अशा गोष्टीमुळे महिलांचे शोषण होते.
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट सांगितले की, महिलांबद्दल द्वेष वाढवणारी, महिलांना त्रासदायक परिस्थितीत भाग पाडणारी किंवा नैतिक सीमांचे उल्लंघन करणारी कोणतीही मीडिया कंटेंट खपवून घेतली जाणार नाही. आयोग सर्व माध्यमांना आणि डिजिटल माध्यमांना सामाजिक भाण जपण्याचे तसेच त्यांची सामग्री कायद्याशी आणि महिलांच्या सन्मानाची जपणूक करण्याशी सुसंगत आहे, याची खात्री करण्याचे आवाहन करते, असेही त्या म्हणाल्या.