

पुढारी ऑनलाईन डेस्क: बीड भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी (दि.२७) परळीमध्ये 'इंव्हेट मॅनेजमेट पॉलिटिक्स चालते', असा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर तिने पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. माध्यमांशी बोलताना धस यांनी प्राजक्ता माळी हिची मागणी धुडकावून लावली होती. दरम्यान, राज्य महिला आयोगाने 'या' प्रकरणाची दखल घेतल्याचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (दि.२९) सांगितले. त्यांनी या प्रकरणी सोशल मीडिया-प्लॅटफॉर्मवर X पोस्ट केली आहे.
चाकणकर यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास केला जाईल. कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार राज्य महिला आयोग करेल".
"महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तृत्वावर काम करत आहेत. काम करताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य, सर्व घटकांनी शहानिशा न करता समाज माध्यमात घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करण्याविराेधात याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणेबाबत आयोग पुढाकार घेईल, असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीला आमदार धस गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेवर टीका केली होती. यावेळी सुरेश धस यांनी काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नाव घेतली होती. त्यामध्ये प्राजक्ता माळीचेही नाव आहे. सुरेश धस म्हणाले, ''जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.'' यावेळी त्यांनी सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांचाही उल्लेख केला.
माझ्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांचा निषेध करते. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ. तुमच्या राजकारणात कलाकारांना का खेचता ? आपला टीआरपी वाढविण्यासाठी कोणत्याही थाराला जातात. तुमच्या राजकारणासाठी आमच्या सारख्या महिला कलाकारांची अब्रु वेशीवर का टांगता ? असा संतप्त सवाल करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीला अश्रू अनावर झाले. माळी शनिवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी तिने या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.