बाबर 'क्रूर', तर औरंगजेब 'मंदिर विध्वंसक'; NCERT च्या नव्या पुस्तकात मुघलांचा काळा इतिहास उघड, छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण वर्णन

NCERT Class 8 new textbook : NCERT च्या इयत्ता ८ वीच्या नव्या पुस्तकात मुघलांच्या अत्याचारांची आणि ऐतिहासिक वास्तवाची स्पष्ट मांडणी करण्यात आली आहे.
NCERT Class 8 new textbook
NCERT Class 8 new textbookfile photo
Published on
Updated on

NCERT Class 8 new textbook :

नवी दिल्ली : बाबर हा 'लोकांची कत्तल करणारा एक क्रूर आणि निर्दयी आक्रमणकर्ता' होता, अकबराची राजवट 'क्रूरता आणि सहिष्णुतेचे मिश्रण' होती, तर औरंगजेबाने मंदिरे आणि गुरुद्वारा उद्ध्वस्त केले, असे वर्णन NCERT च्या इयत्ता आठवीच्या नवीन सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आले आहे. दिल्ली सल्तनत आणि मुघल काळाची विद्यार्थ्यांना ओळख करून देणाऱ्या या पुस्तकात, त्या काळात 'धार्मिक असहिष्णुतेच्या अनेक घटना' घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे.

काय म्हटले आहे NCERT च्या नव्या पुस्तकात?

‘Exploring Society: India and Beyond’ हे इयत्ता ८ वी साठीचे सामाजिक शास्त्राचे भाग १ चे पुस्तक सध्या सुरू असलेल्या शैक्षणिक सत्रासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पुस्तकात दिल्ली सल्तनत, मुघल कालखंड आणि मराठ्यांचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालखंड विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीमध्ये शिकवला जात होता. मात्र, NCERT ने स्पष्ट केले आहे की, आता नवीन अभ्यासक्रमानुसार दिल्ली सल्तनत, मुघल आणि मराठ्यांचा समावेश असलेला भारतीय इतिहासाचा हा कालखंड केवळ इयत्ता आठवीमध्येच शिकवला जाईल. NCERT च्या नवीन पुस्तकांपैकी, दिल्ली सल्तनत आणि मुघल काळाची विद्यार्थ्यांना ओळख करून देणारे हे पहिलेच पुस्तक आहे.

NCERT Class 8 new textbook
NCERT Syllabus : ‘एनसीईआरटी’ची पाठ्यपुस्तके आवश्यक बदल करून राज्यासाठी स्वीकारली जाणार!

कुशल रणनीतिकार आणि खरा दूरदर्शी राजा..., शिवरायांचा विशेष उल्लेख 

या प्रकरणात मुघल आणि सल्तनतच्या प्रशासकीय रचनेचा, १३ व्या ते १७ व्या शतकादरम्यानच्या आर्थिक घडामोडींचा आणि पायाभूत सुविधा व शहरांमधील प्रगतीचाही उल्लेख आहे, ज्यानंतर १६०० च्या दशकाच्या उत्तरार्धात आर्थिक तणावाचा काळ आला. भारतीय समाजाने शहरे, मंदिरे आणि अर्थव्यवस्थेच्या इतर पैलूंची पुनर्बांधणी करण्यात अनुकूलता आणि लवचिकता दाखवली, असे त्यात नमूद केले आहे. या प्रकरणानंतर मराठ्यांवरील एक प्रकरण आहे, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांना 'एक कुशल रणनीतिकार आणि खरा दूरदर्शी राजा' म्हटले आहे. मराठ्यांनी 'भारताच्या सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले' असे लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक धर्मनिष्ठ हिंदू होते, ज्यांनी स्वतःच्या धर्माचे पालन करताना इतर धर्मांचा आदर केला, असे सांगून त्यांनी उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुन्हा बांधली असेही म्हटले आहे. जुन्या पुस्तकात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सक्षम मराठा राज्य स्थापन केल्याचा उल्लेख होता.

कोणत्या गोष्टी दिल्या आहेत पुस्तकात?

The Indian Express ने दिलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकात सल्तनत काळाचे वर्णन राजकीय अस्थिरता आणि लष्करी मोहिमांनी भरलेले असे केले आहे. नवीन पुस्तकातील 'भारताच्या राजकीय नकाशाची पुनर्रचना' हा धडा १३ व्या ते १७ व्या शतकातील भारतीय इतिहासावर आधारित आहे. यामध्ये दिल्ली सल्तनतचा उदय आणि अस्त व त्याला झालेला प्रतिकार, विजयनगर साम्राज्य, मुघल आणि त्यांना झालेला प्रतिकार, तसेच शिखांचा उदय यांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये राजकीय अस्थिरता, लष्करी मोहिमा, गावांचे व शहरांचे लुटमार, मंदिरे आणि विद्यास्थळे उद्ध्वस्त करण्याच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

'या' गोष्टी पूर्वीच्या पुस्तकात नमूद नव्हत्या

NCERT ने स्पष्ट केले की, "या घटना खऱ्या आहेत आणि भारतीय इतिहासावर त्यांचा ठसा आहे. या घटनांचा समावेश का करण्यात आला आहे, याचे स्पष्टीकरण ‘Some Darker Periods in History’ या टिपणामध्ये दिले आहे. इतिहास फक्त स्वच्छ रूपात न मांडता, समतोल आणि पुराव्यावर आधारित स्वरूपात मांडण्यात आला आहे. याशिवाय, पुस्तकातील एका धड्यात 'भूतकाळातील घटनांसाठी आज कोणालाही जबाबदार धरले जाऊ नये' असे स्पष्टीकरणही जोडले आहे.

NCERT च्या नव्या पुस्तकातील ठळक मुद्दे

  • अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने 'श्रीरंगम, मदुराई, चिदंबरम आणि शक्यतो रामेश्वरम यांसारख्या अनेक हिंदू केंद्रांवर हल्ला केला'.

  • दिल्ली सल्तनतच्या काळात 'बौद्ध, जैन आणि हिंदू मंदिरांमधील पवित्र किंवा पूजनीय मूर्तींवर अनेक हल्ले झाले; असा विध्वंस केवळ लुटीसाठीच नव्हे, तर मूर्तिभंजनाच्या विचारधारेतूनही प्रेरित होता'.

  • 'जिझिया' या कराचा संदर्भ देताना, जो काही सुलतानांनी गैर-मुस्लिम प्रजेला संरक्षण देण्यासाठी आणि लष्करी सेवेतून सूट देण्यासाठी लावला होता, पुस्तकात म्हटले आहे की हा कर सार्वजनिक अपमानाचे कारण होता आणि प्रजेला इस्लाम स्वीकारण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक प्रोत्साहन देत असे. इयत्ता सातवीच्या जुन्या पुस्तकात, 'जिझिया'चे वर्णन सुरुवातीला भू-करासोबत आणि नंतर एक स्वतंत्र कर म्हणून गैर-मुस्लिमांकडून भरला जाणारा कर असे केले होते.

  • औरंगजेबाबद्दल पुस्तकात नमूद केले आहे की, काही विद्वान असा युक्तिवाद करतात की त्याचे हेतू प्रामुख्याने राजकीय होते आणि ते त्याच्याद्वारे मंदिरांना दिलेल्या अनुदानांचे आणि संरक्षणाच्या आश्वासनांचे दाखले देतात. त्याच्या निर्णयांमध्ये राजकारणाची भूमिका असली तरी, त्याचे फर्मान (राजपत्र) 'त्याचा वैयक्तिक धार्मिक हेतू देखील स्पष्ट करतात.' त्याने प्रांतांच्या राज्यपालांना शाळा आणि मंदिरे पाडण्याचे आदेश दिले आणि बनारस, मथुरा, सोमनाथ येथील मंदिरे तसेच जैन मंदिरे आणि शीख गुरुद्वारा उद्ध्वस्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news