

NCDRC ruling hair treatment
नवी दिल्ली : 'प्लेटलेट रिच प्लाझ्मा' (PRP) उपचारानंतर रुग्णाचे केस पुन्हा न वाढल्यास, केवळ याच कारणावरून डॉक्टरांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) नुकताच दिला आहे. अध्यक्षीय सदस्य एव्हीएम जे. राजेंद्र आणि सदस्य न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदिरत्ता यांच्या खंडपीठाने तक्रारदाराची नुकसान भरपाईची याचिका फेटाळून लावली आहे.
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील एका वकिलाने 'लाईफसेल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड', कंपनीचे अधिकारी चेतन पुरुषोत्तम, त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. माधुरी अग्रवाल आणि प्लास्टिक सर्जन डॉ. सतीश किशोरनंदन अरोलकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार वकील सुशील मुकेश गगलानी यांनी २०१३ मध्ये केस वाढवण्यासाठी तीन पीआरपी सत्रे घेतली होती. त्यांचा असा आरोप होता की, त्यांना सकारात्मक निकालाचे आश्वासन दिले गेले होते. प्रक्रियेदरम्यान त्यांना खूप वेदना झाल्या आणि रक्तस्त्राव झाला, मात्र केसांची वाढ झाली नाही. 'लाईफसेल' कडे पीआरपी किंवा स्टेम सेल प्रक्रिया करण्याचा परवाना नव्हता.
यापूर्वी मुंबई जिल्हा ग्राहक मंचाने ५९,५२५ रुपये परत करण्याचे आणि १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने ही भरपाई ६ लाख रुपयांपर्यंत कमी केली होती, परंतु 'अनुचित व्यापार पद्धती' आणि 'सेवेतील त्रुटी' असल्याचा निष्कर्ष कायम ठेवला होता.
राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने म्हटले आहे की, " वस्तुस्थिती अशी आहे की, पीआरपी (PRP) सारख्या 'हेअर ग्रोथ फॅक्टर' उपचारांचा सर्व रुग्णांना एकसारखा फायदा होत नाही. काही रुग्णांमध्ये याचा कोणताही परिणाम दिसून येत नाही. मात्र, याचा अर्थ असा होत नाही की संबंधित डॉक्टर पीआरपी प्रक्रिया करण्यास सक्षम नाहीत किंवा उपचारांची पद्धत चुकीची आहे. जिल्हा आणि राज्य आयोगाने 'पीआरपी थेरपी' आणि 'स्टेम सेल थेरपी' यांना एकच प्रक्रिया मानून चूक केली, असेही आयोगाने स्पष्ट केले. आयोगाला डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कोणताही तज्ज्ञ पुरावा आढळला नाही. तक्रारदार स्वतः वकील असून त्यांनी कंपनीची माहिती पुस्तिका (Brochure) वाचली होती आणि संमती पत्रावर स्वाक्षरी केली होती. "तक्रारदाराची दिशाभूल करण्यात आली आहे, असे मानण्यास कोणताही ठोस पुरावा नाही. डॉक्टरांना केवळ अपेक्षित निकाल मिळाला नाही म्हणून दोषी ठरवता येणार नाही, असे स्पष्ट करत NCDRC ने डॉक्टरांच्या बाजूने निकाल दिला आणि तक्रारदाराची वाढीव नुकसान भरपाईची याचिका फेटाळून लावली.
पीआरपी हे टक्कल पडण्यावर एक स्वीकृत उपचार आहे. यामध्ये रुग्णाचे रक्त घेतले जाते, त्यावर प्रक्रिया केली जाते आणि प्लेटलेट-समृद्ध प्लाझ्मा पुन्हा टाळूमध्ये इंजेक्शनद्वारे टोचला जातो. याची तुलना ब्लड बँकांमधील रक्त साठवणुकीशी किंवा विक्रीसाठीच्या रक्त घटकांशी होऊ शकत नाही. परंतु त्याचे निकाल प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात.आरोग्य मंत्रालयाने कोणताही वेगळा प्रोटोकॉल जाहीर करेपर्यंत, त्वचाविकार तज्ज्ञ आणि प्लास्टिक सर्जन पीआरपी उपचार करण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत.