

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी परराष्ट्र मंत्री कुंवर नटवर सिंह (Natwar Singh Passes Away) यांचे शनिवारी (दि.१०) रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीजवळील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नटवर सिंह हे २००४-०५ या यूपीए सरकारच्या काळात परराष्ट्र व्यवहार मंत्री होते.
कुंवर नटवर सिंह (Natwar Singh Passes Away) यांची १९५३ मध्ये भारतीय परराष्ट्र सेवेत निवड झाली. १९८४ मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सेवेचा राजीनामा दिला. त्यांनी निवडणूक जिंकली आणि १९८९ पर्यंत केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले. यानंतर २००४ ते २००५ पर्यंत परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंह यांनी पोलंड, यूके, पाकिस्तान या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले. १९८४ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.
सिंह (Natwar Singh Passes Away) यांचा जन्म १९३१ मध्ये राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात रियासतमध्ये झाला. त्यांचे शिक्षण मेयो कॉलेज, अजमेर आणि सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर येथे झाले. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि चीनमधील पेकिंग विद्यापीठात काही काळ विजिटिंग स्कॉलर म्हणून काम केले. ऑगस्ट १९६७ मध्ये सिंह यांनी महाराजकुमारी हेमिंदर कौर यांच्याशी विवाह केला, त्या पटियाला राज्यातील शेवटचा महाराजा यादवविंदर सिंग यांची मोठी मुलगी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नटवर सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, "नटवरसिंह यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांनी मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणात भरीव योगदान दिले आहे. ते त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी तसेच विपुल लेखनासाठी देखील ओळखले जात होते. या घडीला माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसह आणि प्रशंसकांसोबत आहेत."