

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारणीसाठी भूसंपादनाचा विषय ऐरणीवर आला असून, जागेचा मोबदला कोणत्या स्वरूपात द्यावा हे निश्चित करण्यासाठी मंगळवारी (दि. २२) मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तपोवनात शासनाने नोटीफाईड केलेल्या जागांचे अधिग्रहण करणे बाकी आहे. त्या जागा खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. या जागा दोन वर्षासाठी घ्याव्यात की त्याचा मोबदला इतर माध्यमातून देऊन भूसंपादन करावे, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्या दालनात मंगळवारी बैठक होणार आहे. या बैठकीत टीडीआरचे स्वरूप, टक्केवारी आणि जागा मालकांना ५० टक्के विकसित जागा देण्याचे पर्याय तपासले जाणार आहेत. बैठकीनंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.