‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा आज शपथविधी

‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा आज शपथविधी
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'एनडीए' मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी 7.15 वाजता होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करून मोदी व शहा यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे.

नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्यही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

मंत्र्यांची नावे ठरविण्यासाठी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या निवासस्थानी अनेक बैठका झाल्या. शेवटी मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी मोदी-शहा यांची बैठक झाली.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतःकडेच ठेवणार आहे. भाजपकडून अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांच्यासह इतरांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

नितीशकुमार यांच्या जदयु पक्षातून लल्लन सिंह, रामनाथ ठाकूर, 'रालोद'चे जयंत चौधरी आणि 'लोजप'चे नेते चिराग पासवान यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

राजधानी हायअलर्टवर

राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार असल्याने सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या तैनात करण्यात येतील. शिवाय, उंच इमारतींवर एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर सज्ज असतील. संपूर्ण राजधानी हायअलर्टवर असेल. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही गुप्तचर यंत्रणांवर आहे. विशिष्ट मार्गांवर पास असेल त्यांनाच प्रवेश दिला जाईल.

जमावबंदी, नो फ्लाईंग झोन

संपूर्ण नवी दिल्ली परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. 9 ते 10 जूनदरम्यान पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, रिमोट कंट्रोल्ड एअरक्राफ्टवर संपूर्ण दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.

दहा लोको पायलटना निमंत्रण

शपथविधी सोहळ्यात वंदे भारतच्या 10 लोको पायलटना निमंत्रण देण्यात आले आहे.

मस्क यांच्याकडून अभिनंदन

टेस्लाचे अ‍ॅलन मस्क यांनी मोदींचे अभिनंदन केले आहे. मोदींच्या नेतृत्वात मला माझ्या कंपन्यांच्या माध्यमातून भारतात काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे, असेही मस्क यांनी म्हटले आहे.

उमेदवारांच्या कामगिरीचा बूथनिहाय आढावा घेणार

भाजप मुख्यालयातील बैठकीत जे. पी. नड्डा यांनी सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधला. प्रत्येक राज्य तसेच उमेदवारांच्या कामगिरीचा बूथनिहाय अहवाल तयार करण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातून यांच्या नावाची चर्चा

महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी भाजपकडून नितीन गडकरी, नारायण राणे, पीयूष गोयल, उदयनराजे भोसले, रक्षा खडसे, शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची चर्चा आहे. याशिवाय आयत्यावेळी नवीन नावांचा समावेश होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

पहिल्या टप्प्यात 36 मंत्री शपथ घेणार?

एकूण 36 मंत्री शपथ घेतील, असे सांगण्यात येते. तेलुगू देसम आणि जदयुमधून प्रत्येकी 2 आणि शिवसेनेचा एक कॅबिनेट मंत्री त्यात असेल. याशिवाय राष्ट्रवादी (अजित पवार), लोजप आणि जेडीएसच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्रीही यावेळी शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news