

NanoBaiter Exposes Scammer Scam Caught on Camera Microsoft Tech Support Scam Gaurav Trivedi
रायबरेली (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या रायबरेली शहरात राहणाऱ्या गौरव त्रिवेदी नावाच्या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. हा तरुण "मायक्रोसॉफ्ट टेक सपोर्ट स्कॅम" चालवत असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या स्कॅमरचा चेहरा, त्याचं लोकेशन आणि त्याचं काम करण्याची पद्धत एका X (पूर्वीचं ट्विटर) युजरने थेट उघड केली आहे.
X वर "NanoBaiter" नावाने प्रसिद्ध असलेला युजर, जो स्वतःला "स्कॅमर्सचा शोध घेणारा" म्हणतो, त्यानेच हा प्रकार उघड केला. त्याने एका फसवणूक करणाऱ्या वेबसाईटच्या आडून गौरव त्रिवेदीपर्यंत पोहचण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या संपूर्ण प्रक्रियेत NanoBaiter ने व्हर्च्युअल मशिन वापरून त्रिवेदीच्या संगणकावर ‘रिव्हर्स-हॅक’ केले.
हा स्कॅम एक जुना परंतु अजूनही प्रभावी असलेला "मायक्रोसॉफ्ट टेक सपोर्ट स्कॅम" होता. त्यात वापरकर्त्याच्या संगणकावर बनावट पॉप-अप येतो, ज्यात सांगितलं जातं की सिस्टममध्ये गंभीर एरर आहे. या पॉप-अपमध्ये एक हेल्पलाईन नंबर दिला जातो आणि वापरकर्त्याला कॉल करण्यास भाग पाडलं जातं.
एकदा कॉल झाल्यानंतर, स्कॅमर वापरकर्त्याला AnyDesk किंवा TeamViewer सारख्या रिमोट ऍक्सेस टूल्सच्या माध्यमातून त्याच्या संगणकावर नियंत्रण मिळवतो आणि त्यातून डेटा किंवा पैसे चोरतो.
NanoBaiter च्या म्हणण्यानुसार, त्याने गौरव त्रिवेदीच्या लॅपटॉपचा वेबकॅम अॅक्टिव्ह करून त्याचा चेहरा स्पष्टपणे टिपला. त्याचबरोबर, एका कॉल दरम्यान त्याच्या सॉफ्टफोन डायलरवर दिसलेलं नाव, वाय-फाय लोकेशनद्वारे मिळालेलं त्याचं राहण्याचं ठिकाण — हे सर्व पुरावे NanoBaiter ने उघड केले.
NanoBaiter ने असा दावा केला आहे की, तो गौरव त्रिवेदीचा वेबकॅम थेट पाहू शकत होता — तो कधी जेवतो, झोपतो किंवा स्कॅम करतो, ते सर्व तो लाईव्ह पाहत होता. अखेर त्याने गौरवला थेट ऑनलाइन चॅटमध्ये सामोरा जाऊन त्याला त्याच्याच लॅपटॉपवर खडसावलं.
या घटनेनंतर NanoBaiter ने रायबरेली पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली. यावर रायबरेली पोलिसांनी X वर उत्तर दिलं की, "सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना तपास आणि आवश्यक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत."
या प्रकाराचा व्हिडिओ आणि NanoBaiter च्या पोस्टला आतापर्यंत 8 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी या उघडकीस आलेल्या प्रकाराचे कौतुक केले असून, सायबर क्राईम विरोधात जनजागृतीची गरज अधोरेखित केली आहे.
इंटरनेटवर कुठल्याही पॉप-अपवर विश्वास ठेवू नका, अनोळखी हेल्पलाईन नंबरवर कॉल करू नका आणि आपल्या संगणकावर कोणालाही रिमोट ऍक्सेस देण्यापूर्वी खात्री करून घ्या.