

पुढारी ऑनलाईन डेस्क: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी कर्नाटकमधून काल (दि.६) अटक केली आहे. संबंधित व्यक्तीने तो राजस्थानचा असून, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपासून सलमान खानला येणाऱ्या जीवे मारण्याच्या धमक्या वाढल्याच आहेत. त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा देखील वाढली आहे. दरम्यान कर्नाटकातील हवेली येथील रहिवासी बिकाराम जलेराम बिश्नोई या 35 वर्षीय आरोपीला बुधवारी वरळी पोलिस स्टेशनच्या एका पथकाने त्याच्या चौकशीनंतर ताब्यात देण्यात आले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेसेजमध्ये ट्रॅफिक पोलिस हेल्पलाइनवर 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करणारा आरोपी बिकाराम जालाराम बिश्नोई राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे मुंबई पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.