पुढारी ऑनलाईन डेस्क
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज गुरुवारी ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेअरहोल्डर्सना संबोधित केले. यावेळी मुकेश अंबानी यांनी Jio यूजर्ससाठी Jio AI-Cloud ची दिवाळी ऑफर जाहीर केली. याद्वारे Jio यूजर्संना १०० GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज मिळणार आहे.
"मला Jio AI-Cloud ऑफर जाहीर करताना खूप आनंद होत आहे. आज मी घोषणा करत आहे की, Jio यूजर्संना त्यांचे सर्व फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट, इतर सर्व डिजिटल कंटेंट आणि डेटा सुरक्षितपणे स्टोअर आणि ऍक्सेस करण्यासाठी १०० GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. आम्ही या वर्षीच्या दिवाळीपासून Jio AI-Cloud वेलकम ऑफर लाँच करण्याची योजना आखत आहोत. जिथे क्लाउड डेटा स्टोरेज आणि डेटा-चालित AI सेवा प्रत्येकासाठी सर्वत्र उपलब्ध आहेत; तिथे एक मजबूत आणि परवडणाऱ्या किमतीत ही योजना आणू."
दरम्यान, यावेळी मुकेश अंबानी यांनी यावेळी कंपनीच्या कामगिरीचे कौतुक केले आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी त्यांचा सर्व व्यवसाय महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत आता जगातील सर्वात मोठा डेटा मार्केट बनले आहे. आज, Jio चे नेटवर्क जागतिक मोबाईल ट्रॅफिकच्या जवळपास ८ वाहून नेते. ज्याने विकसित बाजारपेठांसह मोठ्या जागतिक ऑपरेटर्सना मागे टाकले आहे. आठ वर्षांत, Jio जगातील सर्वात मोठी मोबाइल डेटा कंपनी बनली असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भाकीत केले आहे की २०२७ पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. हा अभिमानास्पद टप्पा गाठणे हा आपला देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग असेल, असेही त्यांनी नमूद केले.
जिओ संपूर्ण एआय लाइफसायकल व्यापणारे टूल्स आणि प्लॅटफॉर्म्सचा सर्वसमावेशक संच विकसित करत आहे. त्याला जिओ ब्रेन म्हटले जाईल, असेही त्यांनी सांगितले.