नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून दक्षिण द्वीपकल्पीय भारतात १२ ते १७ जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यात १२ ते १४ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
कोकण आणि गोवा किनारपट्टीवर १२ ते १५ जून या काळात अतिवृष्टीचा (Extremely heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे, तर १६ ते १८ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार (Very heavy rainfall) पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १२ ते १४ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा (वाऱ्याचा वेग ५०-६० किमी प्रति तास, जोरदार वाऱ्यासह ७० किमी प्रति तास) अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात १४ आणि १५ जून रोजी, तर मराठवाड्यात १२ ते १४ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर १२ आणि १३ जून तसेच १६ ते १८ जून दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भात १२ ते १६ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह (वाऱ्याचा वेग ४०-५० किमी प्रति तास) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. १४ ते १८ जून दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि तेलंगणामध्ये पुढील ७ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकात १२ ते १८ जून दरम्यान, तर तामिळनाडूमध्ये १३ ते १७ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. उत्तर कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, वायव्य भारत आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर त्यात घट होईल. राजस्थानमध्ये १४ ते १८ जून दरम्यान धुळीच्या वादळाचा अंदाज आहे. पूर्व आणि मध्य भारतातही बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य भारतातही पुढील ७ दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.